आडेली जिल्हा परिषद मतदारसंघाच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देणार…

ना. नितेश राणे:
प्रत्येक गावाला 50 लाख ते 1 कोटी निधी देण्याची ग्वाही..

⚡वेंगुर्ला ता.०३-: खा. नारायण राणे यांच्या माध्यमातून आज आपण जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुका लढवीत आहोत. आडेली जिल्हा परिषद मतदारसंघ आज आपल्याला पुढील कालावधीत रोजगार, पर्यटनदृष्टीने विकसित करावयाचा आहे. आज विरोधकाकडे कोणताही विकासाचा मुद्दा नसल्याने महायुतीला साथ द्या. पालकमंत्री या नात्याने आडेली जिल्हा परिषद मतदारसंघाच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देईन, अशी ग्वाही राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी आडेली आंबेडकरनगर ( ता. वेंगुर्ला) येथे बोलताना दिली.
वेंगुर्ला तालुक्यातील आडेली जिल्हा परिषद मतदारसंघातील जि. प. व पं. स. उमेदवार यांच्या प्रचारार्थ आडेली श्री देव चव्हाटा मंदिर नजिक आडेली आंबेडकरनगर येथे आज मंगळवारी सायंकाळी उशिरा महायुतीची प्रचार सभा संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर आमदार दिपक केसरकर, भाजपा ज्येष्ठ पदाधिकारी शरदजी चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, आडेली गावचे मानकरी जयवंत धर्णे, दादा धर्णे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सचिव एम. के. गावडे, वेंगुर्ला नगरपरिषद नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, भाजपा तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, शिवसेना तालुकाप्रमुख सचिन देसाई, आडेली जिल्हा परिषद मतदारसंघ उमेदवार समिधा समीर नाईक, आडेली पं. स. उमेदवार नितीन मांजरेकर, वायंगणी पं. स. उमेदवार शीतल राऊत, आडेली सरपंच यशस्वी कोंडसकर, मठ सरपंच रुपाली नाईक, दाभोली सरपंच उदय गोवेकर, पालकरवाडी सरपंच बंड्या पाटील, वायंगणी सरपंच अवी दुतोंडकर, खानोली सरपंच सुभाष खानोलकर, निरीक्षक व नगरसेविका शीतल आंगचेकर व संदेश निकम, सुमन निकम, सचिन शेट्ये, गौरी माईणकर, गौरी मराठे, आडेली ग्रा. पं. उपसरपंच परेश हळणकर, दाभोली उपसरपंच श्रीकृष्ण बांदवलकर श्री. आडेलकर, सुधीर मुंडये, ग्रा. पं. सदस्य, माजी सदस्य विष्णू कोंडसकर, प्रशांत प्रभूखानोलकर, हर्षद साळगावकर आदी उपस्थित होते.
ना. राणे पुढे बोलताना म्हणाले, सर्वच सरपंच यांनी जोमाने काम करावे. प्रत्येक गावाला 50 लाख ते 1 कोटी निधी देण्याची जबाबदारी आपली राहील. आज मनीष दळवी हे खा. नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचे नेतृत्व करीत आहेत. त्यामुळे 5 वर्षे जिल्हा बँकेचे अध्यक्ष राहिलेत. मनीष दळवी हे लंबी रेस का घोडा असल्याने त्यांची चिंता करू नका. खा. नारायण राणे यांचा त्यांना वरदहस्त आहे, त्यामुळे 2029 पर्यंत संयम ठेवा. या मतदारसंघात कासवाच्या माध्यमातून पर्यटन विकास होण्यासाठी दरवर्षी कासव जत्रेचे आयोजन करावयाचे आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री समृद्ध योजना आणून विकास करावयाचा आहे. मनीष दळवी जिल्ह्याचे नेतृत्व करताहेत, त्यामुळे आडेली मतदार संघाच्या विकासासाठी जोमाने काम करा व तिन्ही उमेदवारांना मतदानरूपी आशीर्वाद द्या, या मतदारसंघाच्या विकासासाठी मी कटिबद्ध राहीन, असेही श्री. राणे म्हणाले.यावेळी बोलताना आ. दिपक केसरकर म्हणाले, आडेली हा मतदारसंघ अतिशय सुंदर असा मतदारसंघ असून या मतदारसंघाला समुद्रकिनारे लाभलेले आहेत. जे महत्व तारकर्लीचे आहे, तसेच महत्व उभादांडा, वायंगणीचे आहे. त्यामुळे येथे विकासाचे पोटॅनशियल आहे. या मतदारसंघाचे सर्व सरपंच युतीचे आहेत. त्यामुळे येथील तिन्ही उमेदवार यांना साथ द्या, तुमच्या विकासाची सर्व जबाबदारी आमची राहील.
यावेळी मनीष दळवी म्हणाले, आपले ऋण कधीच विसरणार नाही. महायुती जिंकली पाहिजे, हेच आपले ध्येय आहे. आडेली गोपीनाथ तलाव पुनःरुजीवन करून पाण्याची समस्या सोडविण्यासाठी आपले विशेष प्रयत्न राहणार आहेत. ना. नारायण राणे यांच्या माध्यमातून शेतकरी, मच्छिमार, आंबा, काजू, कोकम, नारळ प्रक्रिया उद्योग आणून रोजगार उपलब्ध करून देणे हे आपले पुढील 5 वर्षातील व्हिजन आहे. दाभोली, वायंगणी व अन्य भागात पर्यटन विकास आणण्यासाठी आपले सदैव प्रयत्न राहतील.यावेळी वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी म्हणाले, भारत देश आज अर्थव्यस्थेत चौथ्या क्रमांकावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भारताने 2014 पासून गेल्या 12 वर्षात मोठा प्रगतीचा सर्वोच्च पल्ला गाठला आहे. त्यामुळे सर्वांनी आज महायुतीला साथ देऊन, तालुक्याची व गावाची उन्नती साधावी, असे बोलताना सांगितले.यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव एम. के. गावडे यांनी 50 पैकी 47 उमेदवार महायुतीचे असतील व 8 पं. स. वर महायुतीचे सभापती असतील, असे बोलताना स्पष्ट केले.सूत्रसंचालन शुभम धुरी यांनी व नितीन मांजरेकर यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page