⚡बांदा ता.०४-: हैदराबाद येथील १०३ वर्षांची वैचारिक व सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या ऐतिहासिक वास्तूत ‘जयवंत दळवी – साहित्य, अनुवाद आणि प्रकारांतर’ या विषयावरील अखिल भारतीय बहुभाषिक राष्ट्रीय चर्चासत्र म्हणजे दीड दिवस चालू असलेले वैचारिक आणि रंजक असा समन्वय साधणारे मंथन होते. राज्य मराठी विकास संस्था, मुंबई पुरस्कृत आणि मराठी ग्रंथ संग्रहालय, हैदराबाद आयोजित हा साहित्य जागर म्हणजे येथील मराठी साहित्यप्रेमींसाठी जणू बौद्धिक पर्वणीच ठरली.
चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी बीजभाषण करताना डॉ. जयंत धुपकर म्हणाले, “अनुवाद ही केवळ भाषांतराची क्रिया नसून ती संस्कृती ते संस्कृती, अनुभव ते अनुभव नेणारी सर्जनशील प्रक्रिया आहे. जयवंत दळवींचे साहित्य विविध भाषांमध्ये पोहोचले, याचे कारण त्यांच्या लेखनातील मानवी संघर्षाचे सार्वकालिक स्वरूप आहे.”
अनुवाद प्रक्रियेत मूळ लेखकाची संवेदनशीलता जपण्याचे आव्हान त्यांनी अधोरेखित केले.
यानंतर डॉ. महेश चंपकलाल शहा यांनी “गुजराती रंगभूमी” या विषयावर भाष्य करताना सांगितले, “दळवींच्या नाटकांतील सामाजिक अस्वस्थता, स्त्री-पुरुष नात्यांचे ताणतणाव आणि मध्यमवर्गीय जीवनातील तडजोडी या बाबी प्रादेशिक मर्यादा ओलांडून सर्व भाषिक रंगभूमीशी संवाद साधतात.”
दळवींच्या नाटकांनी रंगभूमीला दिलेल्या वैचारिक खोलीवर त्यांनी विशेष भर दिला.
अध्यक्षीय समारोप करताना विवेक देशपांडे म्हणाले, “हैदराबादमध्ये मराठी भाषा आणि साहित्य टिकवून ठेवणे ही आमच्यासाठी केवळ जबाबदारी नाही, तर सांस्कृतिक साधना आहे. जयवंत दळवींसारख्या साहित्यिकांवर आधारित असे चर्चासत्र म्हणजे मराठी साहित्याची जिवंत उपस्थिती अनुभवण्याचा क्षण आहे.”
दुसऱ्या सत्रात जयवंत दळवी लिखित ‘सूर्यास्त’ या नाटकाची ध्वनिचित्रफीत सादर करण्यात आली. नाटकातील मानवी नातेसंबंधांचे सूक्ष्म पदर आणि सामाजिक वास्तवाचा तीव्र प्रत्यय रसिकांनी मनापासून अनुभवला. रविवारी झालेल्या सत्रात “जयवंत दळवी यांच्या साहित्याचे विविध भाषांमधील अनुवाद” या विषयावर अभ्यासपूर्ण मांडणी झाली. यामध्ये कानडी अनुवादाबद्दल डॉ. डी. एस. चौगुले आणि इंग्लिश अनुवादाबद्दल डॉ. आशुतोष पोतदार यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली.
हिंदी अनुवादांवर बोलताना डॉ. वसुधा सहस्रबुद्धे म्हणाल्या, “दळवींचे लेखन अनुवादकाला सतत सजग ठेवते. शब्दांचे नव्हे, तर भावनांचे, मौनांचे आणि अंतर्गत संघर्षांचे भाषांतर करावे लागते. म्हणूनच दळवींचा अनुवाद हा एक सर्जनशील अनुभव ठरतो.”
यानंतर डॉ. उमा दादेगावकर यांची ‘बॅरिस्टर – तीन रूपे’ या विषयावरील प्रकट मुलाखत रंगली. कथा, कादंबरी, नाटक हा बॅरिस्टरचा प्रवास दादेगावकर ह्यांनी उलगडला. त्या वेळी त्यांनी दळवींशी बॅरिस्टरबद्दल त्यांच्या प्रत्यक्ष झालेल्या चर्चांच्या खुमासदार आठवणी जागवल्या.
दुपारच्या सत्रात प्रकाश फडणीस आणि सहकलाकारांनी दळवींच्या साहित्यावर आधारित लेख, कथा आणि नाटकांचे प्रभावी अभिवाचन सादर करून रसिकांची विशेष दाद मिळवली. त्यानंतर त्याच प्रवेशाच्या गुजराती अनुवादाचे अतिशय प्रभावी अभिवाचन करून महेश चंपकलाल शहा ह्यांनी उपस्थितांची मने जिंकली.
समारोप सत्रात साहित्य व कला संशोधक डॉ. निर्मोही फडके यांनी ‘जयवंत दळवी – बहुआयामी साहित्यिक’ या विषयावर बोलताना दळवींच्या कथानकांतील वेगळ्या आयामांचा वेध घेताना म्हटले, “दळवींचे लेखन कालजयी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरवली गावात बालपण गेल्यामुळे इथल्या निसर्गाची गूढता आणि मानवी नात्यांमधील प्रेम ह्या भावनेचे अनेक गूढ स्तर त्यांच्या कथानकांमध्ये दिसतात. जे केवळ वासनेचे, आकर्षणाचे नाहीत, तर अस्पर्शित प्रीतीचेही आहेत. दळवींचे साहित्य हे केवळ काळाचे दस्तऐवजीकरण नाही, तर मानवी संवेदनांचे खोल विश्लेषण आहे. त्या दृष्टीने ते बहुआयामी आहे.”
समारोप करताना डॉ. विजय पांढरीपांडे यांनी, दळवींविषयीच्या वैयक्तिक आठवणी सांगितल्या, तसेच अशा बहुभाषिक चर्चासत्रांची गरज अधोरेखित केली. पत्रकार आणि लेखक श्री. गौतम यांनी दळवींशी त्यांच्या वैयक्तिक पातळीवर झालेल्या पत्रव्यवहाराविषयी अतिशय आत्मीयतेने सांगितले.
हैदराबादमध्ये मराठी भाषा, साहित्य आणि सांस्कृतिक ओळख जपणाऱ्या मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या या उपक्रमाचे साहित्यवर्तुळात विशेष कौतुक झाले. मराठी साहित्य टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या येथील साहित्यप्रेमी, पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उपस्थितांनी मनःपूर्वक सलाम केला.
हैदराबादमध्ये जयवंत दळवी साहित्याचा बहुभाषिक वैचारिक जागर…
