गिनिज विक्रम नोंद असलेला ‘सर्वभाषा कवि सम्मेलन’ यंदाही आकाशवाणीवर साजरा…

⚡बांदा ता.०४-: आकाशवाणीच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला प्रसारित होणारा ‘सर्वभाषा कवि सम्मेलन २०२६’ हा विशेष कार्यक्रम यंदाही उत्साहात साजरा होत आहे. गेली ७० वर्षे अखंड सुरू असलेल्या या कार्यक्रमाला ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये स्थान मिळाले आहे.
या अनोख्या उपक्रमात देशातील २२ भारतीय भाषांमधील प्रत्येकी एका कवितेचा अनुवाद इतर भारतीय भाषांमध्ये करण्यात येतो. या कार्यासाठी २२ अनुवादक सहभागी होतात. त्यानंतर त्या अनुवादित कवितांचे अभिवाचन संबंधित राज्यांच्या आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित केले जाते.
यंदा मराठी भाषेतून कवी दासू वैद्य यांची कविता निवडण्यात आली असून ती इतर भारतीय भाषांमध्ये अनुवादित होऊन देशभरातील आकाशवाणी केंद्रांवरून प्रसारित झाली. या कवितांचे मराठीत भावानुवाद करताना (हिंदी किंवा इंग्रजी माध्यमातून) अनुवादक स्वतःही कवी आणि भाषिक दृष्ट्या अधिक समृद्ध होत जात असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
२२ भारतीय भाषांतील कवितांचा, २२ अनुवादकांकडून होणारा हा आदान-प्रदानाचा सोहळा म्हणजे भारतीय प्रजासत्ताकाला दरवर्षी दिली जाणारी एक अनोखी सलामीच ठरत आहे. या उपक्रमासाठी ऑल इंडिया रेडिओचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले.
दरम्यान, यंदा मल्याळम कवितेचा मराठी भावानुवाद व अभिवाचन साहित्य संशोधक डॉ. निर्मोही फडके यांनी केले आहे.

You cannot copy content of this page