ब्रिगेडीयर सुधीर सावंत; भुयारी गटार योजनेच्या कामात झालेल्या भ्रष्टाचार बाबत शासनाकडे चौकशीची मागणी करणार…
मालवण दि (प्रतिनिधी)
मालवणच्या समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेला सिंधुदुर्ग किल्ला हा वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीच्या हद्दीत असून हा किल्ला मालवण नगरपालिकेच्या हद्दीत आल्यास या किल्ल्याच्या संवर्धन व नूतनीकरणास चालना मिळू शकते. नगरपालिका हद्दीत किल्ला असल्यास किल्ल्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांकडून निधी प्राप्त होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग किल्ला मालवण नगरपालिका हद्दीत समाविष्ट करण्यासाठी शिवसेना मालवण तालुक्यातर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधण्यात येणार आहे, तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्फत दिल्ली येथे भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन मागणी करण्यात येणार आहे, असे माजी खासदार ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांनी मालवण येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
मालवण सागरी मार्ग येथील हॉटेल रामेश्वर मध्ये शिवसेना मालवण तालुक्याच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ब्रिगेडीयर सुधीर सावंत हे बोलत होते. यावेळी कुडाळ मालवण मतदार संघ प्रमुख बबन शिंदे, जिल्हा सचिव किसन मांजरेकर, तालुकाप्रमुख राजा गावकर, महेश राणे, शहर प्रमुख बाळू नाटेकर, उपतालुका प्रमुख पराग खोत, अरुण तोडणकर, महिला तालुका संघटक रिया आचरेकर, भारती घारकर, मयुरी घाडीगावकर, शबनम शेख, लुड्डीन फर्नांडिस, राजा तोंडवळकर, व्ही. डी. सामंत आदी उपस्थित होते.
यावेळी सुधीर सावंत म्हणाले, आजच्या बैठकीत मालवण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालवण शहरातील विविध प्रलंबित तसेच आवश्यक कामांबाबत चर्चा करण्यात आली. मालवणचा पर्यटन दृष्ट्या विकास हिताना शहरात व किनाऱ्यांवर स्वच्छता महत्वाची आहे. स्थानिकांना रोजगार देणारे असे येथील पर्यटन हवे. पर्यटकांना आवश्यक अशा सोयी सुविधा येथे निर्माण झाल्या पाहिजेत. स्वच्छता गृहे, पाणी पुरवठा, एटिएम सेवा, भूमिगत वीज लाईन, भुयारी गटार, सिंधुदुर्ग किल्ल्यावर विद्युत रोषणाई आदी निर्माण होणे गरजेचे आहे. या सर्व कामांबाबत आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधून हि कामे मार्गी लावण्यास प्रयत्न करणार आहोत, असेही सावंत म्हणाले.
मालवण शहरातील भुयारी गटार योजनेचे काम रखडले असून या कामात भ्रष्टाचार झाला आहे. शासनाकडे या कामाची चौकशी लावण्याची मागणी आम्ही करणार आहोत. शहरात कचऱ्याची मोठी समस्या असून कचरा डम्पिंग ग्राउंड साठी नवीन जागा बघितली पाहिजे. शहरातील स्वच्छता व कचरा निर्मूलन यामध्ये शिवसेना जाणीवपूर्वक लक्ष घालणार आहे, असेही सावंत म्हणाले. तसेच बंदर विकास मंत्री दादा भुसे यांचा मालवणात दौरा आयोजित करून मालवण बंदर जेटीचे उद्घाटन करण्यात येईल तसेच कोळंब खाडी येथे गाळ उपसा करून बोटिंग प्रकल्प राबविण्याबाबत लक्ष वेधण्यात येईल, असे यावेळी राजा गावकर यांनी सांगितले.
