मंत्री दीपक केसरकर यांनी केले स्पष्ट
मोती तलावातील गाळ काढणार;पाणीटंचाईवर अनोरोजीन लोबो यांनी वेधले लक्ष
⚡सावंतवाडी ता.२७-: येथील मोती तलाव काठावरील आठवडा बाजार शहरातील चार विभागात हलवला जाणार आहे. यात चित्राळी उभाा जार, पांजारवाडा मच्छी मार्केट आदी परिसरात आठवडा बाजार हलवण्यात येणार आहे. बाजार हलवल्यानंतर तिथे व्यापाऱ्यांसाठी टेन्ट उभारून देण्यात येणार असून त्याची देखभाल पालिका करणार आहे. व्यापाऱ्यांनी दिलेल्या ठिकाणीच व्यापार करणे आवश्यक आहे असे शिक्षणमंत्री केसरकर यांनी आज येथे स्पष्ट केले.तर संत गाडगेबाबा मंडई लवकरच उभारण्यात येणार असून तेथील व्यापाऱ्यांचे पुनर्वसन एक्सपोर्ट बेकरी शांतिनिकेतन ते मच्छी मार्केट पर्यंत करण्यात येणार आहे, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.
तर मोती तलावातील गाळ काढण्याचे निर्देश आपण सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले असून मोती तलावाचे सुशोभीकरण करण्यासाठी वीस कोटी रुपये निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. या माध्यमातून तीनशे महिलांना रोजगार मिळणार असल्याचा दावा केसरकर यांनी यावेळी केला. श्री केसरकर यांनी आज पालिकेत आढावा बैठक घेतली. यानंतर ते बोलत होते.
दरम्यान शहरातील मटण मार्केट, योगा सेंटर, क्रीडा संकुल होणार असून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. तसेच सावंतवाडी शहरात पाणीटंचाई होत असल्याने या संदर्भात माजी नगराध्यक्ष अनोरोजीन लोबो, भारती मोरे यांनी बैठकीत केसरकर यांचे लक्ष वेधले. पाण्याअभावी नागरिकांनी उपाशी मरायचं का..? असा संतप्त सवाल लोबो यांनी यावेळी उपस्थित केला. यावर मंत्री केसरकर यांनी जी आय पाईप त्वरित मागवण्यात येणार असून ते उपलब्ध झाल्यानंतर शहरातील पाणीटंचाई दूर होईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी माजी नगरसेवकांना दिली.
