बांदा विकास सोसायटी उपाध्यक्ष बाळू सावंत यांची माहिती
बांदा/प्रतिनिधी
राज्य शासनाने शिधापत्रिकाधारकांसाठी जाहीर केलेला आनंदाचा शिधा सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गोदामातच अडकून राहिल्याने गुढीपाडव्याला वितरित करताना अडचणी निर्माण झाल्यात. येत्या काही दिवसातच याचे योग्य नियोजन करून हा आनंदाचा शिधा लवकरच वितरित करण्यात येईल असे आश्वासन बांदा विकास सोसायटीचे उपाध्यक्ष राजाराम उर्फ बाळु सावंत यांनी पत्रकातून दिले आहे.
शासनाने दिवाळीत राज्यातील कोट्यावधी शिधापत्रिकाधारकांना दिवाळीत १०० रुपयात पामतेल, डाळ, रवा, साखर हे किट दिले होते. यावर्षी देखील राज्याच्या अर्थसंकल्पात हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी आनंदाचा शिधा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. मात्र कर्मचारी संपामुळे किट वितरण व्यवस्था कोलमडून पडली. नियमित धान्याचे वितरण सुरु असून लवकरच आनंदाचा शिधा देखील उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले आहे.
