केंद्रीय मंत्री नारायण राणेंची ग्वाही; दोडामार्ग भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट..
दोडामार्ग ता.१९-:
तिलारीचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी लवकरच तिलारीत बैठक आयोजित केली जाईल.त्या बैठकीस पर्यटन खात्याचे व पाटबंधारे खात्याचे अधिकारी उपस्थित राहून तिलारीच्या पर्यटन विकासासाठी काय करता येईल यासंबंधी चर्चा करून तसा आराखडा तयार केला जाईल अशी ग्वाही केंद्रीय मंत्री ना.नारायण राणे यांनी तिलारीधरण भेटीदरम्यान भाजपच्या तालुका पदाधिकाऱ्यांना दिली.
नुकतेच ते तालुक्याच्या खाजगी दौऱ्यावर आले असता त्यांनी तिलारी धरण परिसराला भेट देऊन परिसराची माहिती स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून करून घेतली .यावेळी त्यांच्यासोबत पर्यावरण तज्ञासोबतच भाजपचे माजी जि. प.उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर , कसई-दोडामार्ग नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष संतोष नांनचे , उपस्थित होते. श्री. म्हापसेकर यांनी तिलारी धरण परिसराची सविस्तर माहिती ना. राणेंना दिली . तिलारीत पर्यटनाला पोषक वातावरण आहे.शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिध्द असलेले गोवा राज्यही अत्यंत जवळ आहे.त्यामुळे तिलारी पर्यटनदृष्ट्या विकसित झाली तर गोव्यात येणारा देशी – विदेशी पर्यटक तिलारीत वळविणे सहज शक्य होईल.त्यादृष्टीने आपण प्रयत्न करावेत अशी मागणी म्हापसेकर यांनी केली.त्यावर सकारात्मक मान्यता देत येथील निसर्ग पर्यावरण दृष्ट्या अनुकूल असून लवकरच तिलारीच्या पर्यटन विकासासाठी काय करता येईल हे ठरविण्याकरिता पर्यटन खाते व पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना तिलारीत आणून संयुक्त बैठक घेतली जाईल. इतर खात्याच्या अधिकाऱ्यांचीही आवश्यता भासल्यास त्यांनाही आमंत्रित केले जाईल व तिलारीच्या पर्यटन विकासाचे धोरण निश्चित केले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
