वैफल्यग्रस्त झाल्याने आ नाईक यांची शिवसेना नेत्यांवर टीका

तालुका प्रमुख राजा गांवकर यांचे प्रतिउत्तर

मालवण (प्रतिनिधी)

आमदार वैभव नाईक हे वैफल्यग्रस्त होऊन शिवसेनेचे संपर्क प्रमुख रवींद्र फाटक, मंत्री दीपक केसरकर व मंत्री उदय सामंत यांच्यावर टीका करत आहेत. रवींद्र फाटक यांना जिल्ह्याबाहेर काढण्याची भाषा करणारे आमदार नाईक यांची टीका करण्याची ऐपत नाही. आम. नाईक यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चांगले संबंध असल्याने त्यांनी आमच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश करावा, असे आव्हान शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजा गावकर यांनी पत्रकार परिषदेत देतानाच आम. नाईक आमच्या पक्षात आल्यास त्यांना आमच्या पक्ष संघटनेत ढवळाढवळ करता येणार नाही, त्यांनी आपले आमदाराकीचे काम करावे, असेही म्हटले आहे.

मालवण सागरी मार्ग येथील हॉटेल रामेश्वर येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी तालुकाप्रमुख राजा गावकर, महेश राणे, जिल्हा सचिव किसन मांजरेकर, कुडाळ मालवण विधानसभा क्षेत्र प्रमुख बबन शिंदे, महिला तालुकाप्रमुख रिया आचरेकर, गीता नेवाळे, उपतालुकाप्रमुख पराग खोत, अरुण तोडणकर, महिला उपतालुकाप्रमुख भरती घारकर, शबनम शेख, शहरप्रमुख बाळू नाटेकर, महिला शहरप्रमुख लुईदीन फर्नांडिस, हडी महिला विभाग प्रमुख शिल्पा तोंडवळकर, उपविभाग प्रमुख शाहीन शेख, राजा तोंडवळकर आदी उपस्थित होते.

यावेळी राजा गावकर म्हणाले, शिवसेनेचे नवनियुक्त लोकसभा मतदार संघ संपर्कप्रमुख रवींद्र फाटक यांच्यावर आम. नाईक टीका करत आहेत. मात्र फाटक यांच्या ताकदीची आम. नाईक यांना कल्पना नाही. माजी आरोग्य मंत्री आणि उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय दीपक सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यामागे रवींद्र फाटक यांचीच कामगिरी आहे. त्यामुळेच फाटक हे असेच आणखी प्रवेश घेत राहतील या भीतीने आम. नाईक हे फाटक यांना जिल्ह्याबाहेर काढण्याची भाषा करत आहेत, असेही गावकर म्हणाले.

आज आपण निधी आणल्याचा दावा आम. नाईक करत आहेत. मात्र हा निधी त्यांनी आणला नसून तो मुख्यमंत्री शिंदे यांनी मंजूर केला आहे. महामार्गावर लागलेल्या भगवा चषक क्रिकेट स्पर्धेच्या बॅनर मध्ये आमदार नाईक यांचा फोटो दिसत नाही. आम. नाईक व खासदार विनायक राऊत यांच्यात काय चालू आहे हे सर्वश्रुत आहे. तौक्ते वादळ काळात एकनाथ शिंदे यांनी पुरविलेल्या मदती मधूनच नाईक यांनी वादळग्रस्ताना मदत केली. त्यामुळे नाईक यांचे स्वतःचे कर्तृत्व काय हे आम्हाला माहित आहे. मंत्री केसरकर व मंत्री सामंत यांच्यावर टीका करणाऱ्या आमदार नाईक यांची त्यांच्यापर्यंत पोहचण्याची ऐपत नाही. विकासाकामाची गती नाही. केवळ टक्केवारीची कामे आम. नाईक करतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चांगले संबंध असणारे आमदार नाईक यांनी आमच्या शिवसेनेत येत असतील तर त्यांनी जाहीर प्रवेश करावा. तसे झाल्यास ती मोठी राजकीय उलथापालथ असेल. मात्र आमच्या पक्ष संघटनेत त्याना ढवळाढवळ करता येणार नाही, असेही राजा गावकर म्हणाले.

आम्ही ठाकरे गट शिवसेनेत असताना आमदार नाईक यांचे बरेच अनुभव घेतले, कार्यकर्त्यांच्या पाठीशी न राहता पाठी खेचायचे काम त्यांनी केले. कार्यकर्त्यांनी निवडून आणण्यासाठी केलेल्या मेहनतीची, उपकाराची जाण नाईक यांना नाही, असेही गावकर म्हणाले.

यावेळी बबन शिंदे म्हणाले, आमदार नाईक यांनी ठाकरे गट शिवसेनेत स्वतःची संघटना चालविण्याचे प्रयत्न केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कायम संपर्कात असणारे आमदार नाईक हे ताकाला येऊन भांडे लपविण्याचा प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरे यांची फसवणूक करण्यापेक्षा त्यांनी आमच्या शिवसेनेत प्रवेश करून दाखवावा, असेही शिंदे म्हणाले.

You cannot copy content of this page