शिवगर्जना महानाट्य प्रयोगामुळे उपलब्ध झालीय सुवर्णसंधी;निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विशाल परब व भाजपचे आयोजन
कुडाळ ता.१६-: भाजपचे युवा नेते, माजी खासदार डॉ निलेश राणे यांच्या वाढदिवसाची जोरदार तयारी विशाल फाऊंडेशन सेवा अध्यक्ष विशाल परब आणि सिंधुदुर्ग भाजप यांच्यावतीने जोरदार सुरू असून शुक्रवारी यानिमित्त आशिया खंडातील सर्वात मोठे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिवगर्जना हे नाटक सादर करण्यात येणार आहे. यामुळे शिवप्रेमी यांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन प्रत्यक्ष पाहील्याची अनुभूती मिळविण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे.
भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून विशाल परब, संजू परब यांची ओळख आहे. प्रतिवर्षी निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रम यांच्याकडून आयोजित करण्यात येतो. त्याप्रमाणे यावर्षी वाढदिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून शिवगर्जना हे महानाट्य आयोजित करण्यात आले आहे. त्याची पूर्व तयारी जोरदार सुरू असून हे नाटक शाळकरी मुलांना मोफत पाहण्याची व्यवस्था सुद्धा आयोजकांनी केली आहे. उद्याच्या कार्यक्रमाला केंद्रीयमंत्री नारायण राणे, अनुराग ठाकूर, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, पालकमंत्री रवींद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्या अनुषंगाने जोरदार तयारी करण्यात येत आहे.
