मालवण (प्रतिनिधी)
जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी आजपासून राज्यात शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. यां संपात मालवण तालुक्यातील विविध शासकीय व निमशासकीय विभागाचे कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले असून यां संपास तालुक्यातील कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे मालवण मधील विविध शासकीय विभागाच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांविना शुकशूकाट पसरला होता. मालवण तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्या होत्या. मालवण तहसील विभागातील ८लिपिक, २५ तलाठी, ७ मंडळ अधिकारी, ७ अव्वल कारकून असे कर्मचारी संपात सहभागी झाले होते. तर पंचायत समिती मध्येही शुकशूकाट पसरला होता. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिकांची विविध शासकीय कामे मात्र रखडल्याचे दिसून आले. तसेच यां संपात तालुक्यातील शाळा, महाविद्यालय यामधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी देखील सहभागी झाले होते.
