न्यायालयाने सुनावली तीन दिवसांची पोलिस कोठडी
*💫देवगड दि.१७-:* जामसंडे कावलेवाडी येथील महिलेला दागीने पॉलिश करण्याच्या बहाण्याने आलेल्या राहुलराज अनिल साह (२४) या बिहारी युवकाला महिलेच्या सतर्कतेमुळे थेट जेलची हवा खावी लागली आहे, मात्र त्याचा दुसरा सहकारी पळून जाण्यात यशस्वी झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. दरम्यान बुधवारी राहुलराज यास न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, मुंबई विरार येथे राहणाऱ्या विनिता विलास भुवड (५०) या माहेरी जामसंडे कावलेवाडी येथे वडीलांची तब्येत चांगली नसल्याने त्यांना पाहण्यासाठी आल्या होत्या. काल मंगळवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान त्या माहेरी झाडांना पाणी घालत असताना दागीने पॉलिश करण्याचा बहाण्याने आलेल्या राहुलराज अनिल साह याने भांडी व दागीने पॉलिश करतो, असे सांगीतले. यावेळी विनीता भुवड यांनी प्रथम घरातील तांब्याची भांडी पॉलिश करण्यास दिली. त्यांना पॉलिश केल्यानंतर चकाकी आल्याने त्यांनी पैंजण पॉलिश करण्यास दिली. यावेळी पैजणीच्या वजनात घट झाल्याचे लक्षात आले व त्यांनी केलेल्या बतावणीचा संशय आल्याने त्याला तात्काळ पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांनी संशयित राहुलराज याच्याविरूध्द गुन्हा दाखल करून अटक केली. बुधवारी त्यास न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्याला १९ फेब्रुवारीपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान याच्याबरोबर दागीने पॉलिश करण्यासाठी आलेला अमित भगत हा युवक त्या ठिकाणावरूनच पळून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तपास पोलीस हेडकोन्स्टेबल शैलेंद्र कांबळे करीत आहेत.
