*💫मालवण दि.१७-:* मालवण तालुक्यातील ओझर कांदळगाव मसुरे बांदिवडे आडवली रस्त्याची विशेष दुरुस्ती करण्यासाठी निविदा सूचना प्रसिद्ध करण्यासह अल्प कालावधी निविदा काढण्यास मंजुरीचे आदेश पत्र महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यासन अधिकारी विवेक कांबळे यांनी सा. बां.विभागाचे अधीक्षक अभियंता याना दिल्याची माहिती राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर यांनी दिली आहे. सदर कामासाठी दोन कोटी पन्नास लाख रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आल्याने लवकरच निविदा प्रक्रिया होऊन सदर कामास प्रत्यक्ष सुरवात होणार आहे. दरम्यान याबाबत मोंडकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री अशोक चव्हाण यांची दोन वेळा मंत्रालयात भेट घेत पाठपुरावा केला होता. दरम्यान याबाबत कांदळगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून खासदार, पालकमंत्री, आमदार याना सुद्धा या रस्त्याबाबत दुरुस्ती साठी लक्ष वेधण्यात आले होते. माजी सभापती उदय परब यांनी सुद्धा या मार्गावरील अपघातांची संख्या वाढल्याने २६ फेब्रुवारी पासून उपोषणाची नोटीस सा. बांधकाम विभागाला दिली होती. तसेच सत्ताधारी आमदारांनी या मार्गावरून आठवडा भर प्रवास करण्याचे आवाहन सुद्धा केले होते. परब यांच्या उपोषणास बांदिवडे ग्रामपंचायत च्या वतीने पाठिंबा व्यक्त करण्यात आला होता. तसेच कांदळगाव ग्रामस्थांनी रस्ता रोको सुद्धा केला होता. याच रस्त्यासाठी कंदळगाव सुपुत्र भारतीय कामगार सेनेचे जी एस परब यांनी आमदार सुनील प्रभू याना सुद्धा निवेदन देत लक्ष वेधले होते. लवकरच प्रत्यक्ष निविदा प्रक्रिया होऊन सदर रस्त्याच्या कामास सुरवात होणार असल्याची माहिती अरविंद मोंडकर यांनी दिली आहे.
ओझर कांदळगाव बांदिवडे रस्त्यासाठी निविदा प्रक्रियेस मंजुरी…!
