⚡मालवण ता.०४-:
आपले जीवन हाच एक रंगमंच आहे या रंगमंचावरील नाटकात आपण सर्वजण काम करत आहोत. या रंगभूमीवर काम करताना कधीही थांबायचे नसून पुढील पिढी आपल्याला घडावायची आहे. समाज देश घडविण्यासाठी माणूस घडविणे महत्वाचे असून माणसे घडविण्याचे काम अष्टपैलू कलानिकेतन संस्था करत आहे, असे प्रतिपादन माजी प्राचार्य मेजर श्री. श्रीपाद गिरासागर यांनी केले.
अष्टपैलू कलानिकेतन, मालवण या संस्थेतर्फे स्व. नाटककार राम गणेश गडकरी यांच्या स्मरणार्थ जिल्हास्तरीय सवेश साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा तसेच जीवन गौरव पुरस्कार वितरण कार्यकम आज सायंकाळी मालवण भरड येथील दत्त मंदिरात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी प्राचार्य मेजर श्रीपाद गिरसागर व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व नटराजाच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी मालवण गवंडीवाडा येथील ज्येष्ठ नाट्य कलावंत विलास शिवराम गवंडी यांना माजी प्राचार्य श्रीपाद गिरसागर यांच्या हस्ते शाल श्रीफळ, रक्कमेची थैली मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांच्या पत्नी वैशाली गवंडी यांची ओटी भरण्यात आली. यावेळी व्यासपीठावर अष्टपैलू कालनिकेतनचे अध्यक्ष भालचंद्र केळुसकर, सचिव सुधीर कुर्ले, संजय धूपकर, केशव पणशीकर आदी उपस्थित होते.
यावेळी श्रीपाद गिरसागर यांनी कलाकारांना प्रेक्षकांच्या प्रतिसादाची गरज असते, प्रोत्साहनाची गरज असते. अष्टपैलू कालनिकेतन संस्था गेली बारा वर्षे सातत्याने काम करत कलाकारांना प्रोत्साहन देत आहे, माणूस घडवत आहे असे सांगितले. यावेळी सत्कारमूर्ती विलास गवंडी यांनी पुरस्काराबद्दल आभार व्यक्त केले.
यावेळी रविना पांजरी, केशव पणशीकर, संजय धूपकर, भालचंद्र केळुसकर, सुधीर गोसावी, पंकज पाटील, सतीश शेडावलकर, भाऊ मेस्त्री, अनिकेत गवंडी, विनोद सातार्डेकर यांना संगीत विशारद म्हणून सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक भालचंद्र केळुसकर यांनी केले. मानपत्र वाचन सुशांत पवार यांनी केले. सूत्रसंचालन विनोद सातार्डेकर यांनी केले तर आभार सुधीर गोसावी यांनी केले. या कार्यक्रमानंतर सवेश साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा संपन्न झाली.
