कचरा न टाकण्याबाबत वायरी भूतनाथ ग्रा.पं. कडून फलकांमधून जनजागृती

⚡मालवण ता.०४-: पर्यटन गाव असलेल्या वायरी भूतनाथ मध्ये स्वच्छते बाबत जनजागृती व्हावी तसेच गावात कचरा टाकला जाऊ नये यासाठी वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीने पाऊल उचलत कचरा न टाकण्याबाबत ग्रामस्थांना जाणीव निर्माण करून देणारे तसेच कचरा टाकल्यास दांडात्मक कारवाईचा धाक दाखविणारे फलक ठिकठिकाणी बसविले आहेत. या उपक्रमाचे पर्यावरण प्रेमी नागरिकांनी स्वागत करत वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीचे कौतुक केले आहे.

वायरी भूतनाथ ग्रामपंचायती कडून गावातील काही ठिकाणी तसेच समुद्र किनाऱ्यावर अशाप्रकारचे फलक लावले आहेत. आपल्या गावाची व आजूबाजुच्या परिसराची स्वच्छता राखणे हे आपले सर्वाचे आद्य कर्तव्य आहे. आपल्या गावातील परिसरात प्लस्टिक पिशव्या, काचेच्या बॉटल, शिल्लक राहिलेले अन्न व इतर ओला व सुका कचरा टाकण्यास कायदेशीर बंदी आहे. तरी परिसरात वर नमूद कचरा टाकल्यास व हि बाब ग्रामपंचायत वायरी भूतनाथच्या निदर्शनास आल्यास तसेच संबंधित व्यक्तीचे नांव समजल्यास त्यांच्या विरुध्द ग्रामपंचायत मार्फत ५०० रु. दंड करुन फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच कचरा टाकणाऱ्या किंवा कचरा निर्माण करणाऱ्या व्यक्तीचा फोटो काढून त्याचे नांव कळविणाऱ्या व्यक्तीस रक्कम रु. २०० रु. ग्रामपंचायत वायरी भूतनाथ कडून बक्षीस देण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे ग्रामपंचायतीने फलकावरील मजकूरात म्हटले आहे. या फलकांमुळे ग्रामस्थांमध्ये व पर्यटकांमध्ये कचरा उघड्यावर न टाकण्याबाबत जागृती निर्माण होण्यास मदत होणार आहे.

You cannot copy content of this page