मराठी भाषा दिनानिमित्त ग्रंथ दिंडी आणि भाषा जागर

कोकण मराठी साहित्य परिषदेचे आयोजन

सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषदेच्यावतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सोमवारी ग्रंथ दिंडी व मराठी भाषा जागर करण्यात आला. सावंतवाडी शहरातील गांधी चौकापासून मिरवणूकीला सुरुवात झाली. महाराष्ट्राचे राज्य गीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ सादर करत शहरातील सुधाताई कामत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर २ च्या विद्यार्थ्यांनी मिरवणुकीत रंगत आणली. त्यानंतर बाजारपेठ व मोती तलावाकाठी कवी केशवसुत कट्ट्याजवळ मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.

यावेळी उपस्थित भाषा प्रेमी तसेच विद्यार्थ्यांनी ‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे!’, ‘मराठी भाषेचा विजय असो!’, ‘मराठी बोलूया, मराठी जगूया!’, ‘सीमाभाग महाराष्ट्रात आलाच पाहिजे!’
‘सर्व दुकानांच्या पाट्या मराठीतून लागल्याच पाहिजे..!’ अशा विविध घोषणांनी यावेळी मोती तलावाचा परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी जिल्हा परिषद शाळा नंबर दोनचे विद्यार्थी, सर्व शिक्षक, शालेय समितीचे अध्यक्ष नंदू गावडे व इतर सदस्य रॅलीत सहभागी झाले होते. तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष ॲड. संतोष सावंत, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सहसचिव राजन तावडे, मराठी भाषा अध्यापक मंडळाचे राज्य कार्याध्यक्ष भरत गावडे, अँड. नकुल पार्सेकर, कोमसापचे सदस्य प्रा. रुपेश पाटील, दीपक पटेकर, विनायक गावस, ज्येष्ठ सल्लागार प्रा. सुभाष गोवेकर, प्रा. डॉ. जी. ए. बुवा, मेघना राऊळ, मंगल नाईक – जोशी, माजी नगरसेवक संजय पेडणेकर, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, नंदू गावडे, सौ. गवस, राजेश जाधव, श्री. देसले, सौ. फाले, युवा रक्तदाता संघटनेचे शुभम बिद्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून आमचा लढा सुरूच राहील. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून मराठी भाषेला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष ॲड. संतोष सावंत यांनी व्यक्त केले. कार्यक्रमात ॲड. नकुल पार्सेकर, डॉ. जी. ए. बुवा, राजन तावडे आदींनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विनायक गावस यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.रुपेश पाटील यांनी केले.

You cannot copy content of this page