सामाजिक न्याय भवन येथे छेडले धरणे आंदोलन;ठेकेदार कंपनीकडून मानधन रखडले
सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक न्यायभवन व वसतिगृहात ठेकेदार कंपनी मार्फत करण्यात आलेल्या ३५ सुरक्षा रक्षकांना ५ महिन्यांचा तर ३३ सफाई कामगारांना ८ महिन्यांचे मानधन ठेकेदार कंपनीकडून देण्यात आलेले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी आजपासून कामबंद आंदोलन सुरू केले असून आज सामाजिक न्याय भवन येथे धरणे आंदोलन छेडले. शासनाच्या सामाजिक न्याय भवन व शासकीय वसतिगृह येथे सुरुक्षा रक्षक आणि सफाई कामगार कार्यरत आहेत. हे कर्मचारी पुरविण्याचा ठेका शासनाने कंत्राटदार कंपन्यांना दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक न्याय भवन व वसतिगृहात भारत विकास गृप प्रा. ली. पुणे या कंपनी मार्फत ३५ सुरक्षा रक्षक तर क्रिस्टल इंटिगेटेड सर्व्हिसेस प्रा.ली. मुंबई या कंपनी मार्फत ३३ सफाई कामगार नियुक्त करण्यात आले आहेत. यातील सुरक्षा रक्षकांना सप्टेंबर २०२० ते जानेवारी २०२१ या ५ महिन्यांचा पगार कंपनीने दिलेला नाही. तर सफाई कामगारांना जून २०२० ते जानेवारी २०२१ या ८ महिन्यांचे वेतन कंपनीकडून देण्यात आलेले नाही. याबाबत कामगारांनी कंपनीचे वारंवार लक्ष वेधले आहे. मात्र कंपनी व्यवस्थापन कडून कोणतेही समर्पक उत्तर मिळत नाही. गेली अनेक महिने मानधन न मिळाल्याने या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी अखेर आज पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सिंधुदुर्ग यांचे लक्ष वेधण्यासाठी आज सामाजिक न्याय भवन येथे धरणे आंदोलन छेडले. …. तर जीवाचे बरे वाईट करू सफाई कामगार आणि सुरक्षा रक्षकांना थकीत मानधन दिले जात नाही. कंपनी व प्रशासनाचे लक्ष वेधून काही होत नाही. त्यामुळे वेतन अभावी जीवाचे बरे वाईट करण्याची मानसिकता या कर्मचाऱ्यांच्या मनात येत असून तसा प्रकार घडल्यास त्याला सिंधुदुर्ग सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व ठेकेदार कंपनी जबाबदार राहील असा इशाराही या कामगारांनी दिला आहे.
