खडतर प्रवास आणि संकटांचा केलेला सामना यातूनच मी घडलो

*ज्येष्ठ नाटककार, वस्त्रहरणकार आणि मराठी नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांचे प्रतिपादन

मालवण दि प्रतिनिधी वस्त्रहरणला ४१ वर्षे पूर्ण होत असताना आज मालवणात झालेला आपला सत्कार ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. बालपणापासून आयुष्याचा सुरू झालेला खडतर प्रवास व संकटांचा केलेला सामना आणि पत्करलेल्या जोखिमा यातून आपण घडत गेलो असे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार, वस्त्रहरणकार आणि मराठी नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी मालवणात आयोजित सलाम गंगाराम या कार्यक्रमात बोलताना केले. वस्त्रहरण नाटकाला ४१ वर्षे पूर्ण झाल्या बद्दल आणि वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांच्या ८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून अष्टपैलू कलानिकेतन मालवण आणि स्वराध्या फाऊंडेशन मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांचा नागरी सत्कार व प्रकट मुलाखातीचा ‘सलाम गंगाराम’ या कार्यक्रम रविवारी पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर गंगाराम गवाणकर यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते दीपक परब, मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, गजलकार मधुसूदन नानिवडेकर, दिलीप मडकईकर, अष्टपैलू कालानिकेतनचे अध्यक्ष भालचंद्र केळुसकर, स्वराध्या फाउंडेशनचे अध्यक्ष सुशांत पवार, उपाध्यक्ष गौरव ओरसकर, नगरसेवक नितीन वाळके, शुभदा टिकम, सुधीर कुर्ले, सौम्या कुर्ले आदी व इतर उपस्थित होते. यावेळी गंगाराम गवाणकर यांचा आयोजकांतर्फे शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तर नगरपालिकेतर्फेही नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्याहस्ते गवाणकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गवाणकर यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. प्रारंभी नितीन वाळके यांनी प्रास्ताविक करत सलाम गंगाराम कार्यक्रमाच्या आयोजनाबाबतची माहिती दिली. यावेळी नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी वस्त्रहरण नाटक पाहताना डोळे बंद केले तरी हसायला यायचे आणि कान बंद केले तरीही हसायला यायचे एवढी जबरदस्त विनोदी लेखनशैली गवाणकर यांनी या नाट्यलेखनातून दाखविली आहे, असे सांगितले.यावेळी दीपक परब, मधुसूदन नानिवडेकर ,भालचंद्र केळुसकर यांनीही गव्हाणकर यांच्या विषयी भावना व्यक्त केल्या यानंतर कार्यक्रमाचा मुख्य भाग असलेली गंगाराम गवाणकर यांची प्रकट मुलाखत संपन्न झाली. या मुलाखती दरम्यान वस्त्रहरण नाटकातील पात्रांचे प्रवेशही सादर करून कार्यक्रमात हास्याचे रंग भरण्यात आले. यामध्ये तात्या- विलास देऊलकर, मास्तर – विनाेद सातार्डेकर- गाेप्या -सुनिल कदम, प्राम्पटर- अभय कदम, अर्जुन – सचिन टिकम, भीम – शिवा जाधव, विदुर – सुनिल परुळेकर, ध्रुतराष्ट्र – संजय राेगे, दुर्याेधन – हरी चव्हाण, दुःशासन – भाऊ सामंत, शकुनी मामा -प्रभुदास आजगांवकर यांनी भूमिका साकारल्या. यासाठी तबला- सुधीर गोसावी, हार्मोनियम – भालचंद्र केळुसकर यांची संगीतसाथ लाभली.

You cannot copy content of this page