⚡मालवण ता.११-:पर्यटन गाव असलेल्या तारकर्ली मधील रांज नाल्यावरील पुलाचे काम अपुऱ्या अवस्थेत गेले काही महिने बंद आहे. काम पूर्ण नं झाल्याने वाहतुकीस खोळंबा होत आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात पुलाच्या उर्वरित बांधकामाला तसेच रांज नाल्यातील गाळ काढण्यास तात्काळ सुरुवात न केल्यास मालवण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर १५ फेब्रुवारी रोजी आमरण उपोषणास बसण्याचा इशारा तारकर्लीचे सामाजिक कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टी कोकण विकास आघाडी मुंबईचे सचिव सुरेश बापर्डेकर यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभागीयं कार्यालय मालवणच्या अभियांत्यांना दिला आहे.
तारकर्ली येथील रांज नाल्यावरती जुना पूल लहान होता, त्यामुळे वाहतुकीला अडचणी येत होत्या. पावसाळ्यात त्यावरून पाणी भरत असल्याने वाहंनाना पुलावरून ये -जा करतांना बऱ्याच अडचणी येत होत्या. त्यामुळे नवीन पूल बांधणे अत्यावश्यक होते, याकरिता ग्रामस्थांनी मागणी करून गेल्यावर्षी नवीन बांधकामाला सुरवात केली. पण ते बांधकाम मंद गतीने चालू असून त्यात बऱ्याच अडचणी येत आहेत. ठेकेदांनी दोन महिने झाले पुलावर दगडाची कपर टाकली आहे ती वाहतुकीला अडथळा ठरत असून त्यावरून फोर व्हिलर, टू व्हीलर गाड्या घसरत असल्याने अपघात होत आहेत, असे बापार्डेकर यांनी म्हटले आहे.
देवबाग तारकर्ली येथील प्रवाशांसाठी मुंबईला व मुंबईवरून गावी येण्याकरिता खाजगी लक्झरी बसेस सोडल्या जात होत्या. मात्र पूलाचे बांधकाम चालू असल्याने त्या गाड्या एक वर्ष बंद असल्याने येथील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत या पुलाचे काम तात्काळ सुरू न केल्यास उपोषणाला बसणार, असा इशारा सुरेश बापार्डेकर यांनी दिला आहे.
