⚡कणकवली ता.०९-: ओसरगाव पटेलवाडी ते गावठणवाडीमार्गे ओसरगावचे ग्रामदैवत लिंग माऊली देवालयाकडे जाणारा कच्चा रस्ता दुरुस्तीस जेसीबीने सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी ग्रामदेवतेला श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. कित्येक वर्षे पूर्णपणे रस्ता नसल्यामुळे गावातील लोकांनी एकत्र येत विनामोबदला जमीन देण्याचे ठरविले. त्याप्रमाणे कच्चा रस्ता करण्याचे ठरले. कारण शॉर्टकट देवालयाकडे जाणारा एकमेव रस्ता हायवेवरून उपलब्ध होणार आहे. शाळेतील मुले, रेशनिंग दुकानावर येणारे ग्रामस्थ पटेलवाडी, गावठणवाडी, मळीवाडी, सडेवाडी, बौद्धवाडी आदी अर्ध्या गावाला जोडणारा रस्ता तयार होणार तसेच मुख्य बाब देवाची वाट असल्यामुळे या रस्त्याला भविष्यात प्रचंड महत्व येणार आहे त्यामुळे भविष्यात ग्रामपंचायतीने व शासनाने कायमस्वरूपी खडीकरण डांबरीकरण होण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले जाणार आहेत त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
