⚡कणकवली ता.०८-: कणकवली आचरा मार्गावरील पिसेकामते कदमवाडी येथे मोटरसायकल व कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकलस्वर कृष्णा अच्युत मसुरकर (वय 58, राह.मसुरे कावावाडी ता.मालवण) हे जागीच ठार झाले असून त्यांच्या समवेत असलेली त्यांची मेहुणी वैभवी विजय तोडणकर( राह- मुंबई) ही गंभीर जखमी झाली आहे.हा अपघात सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास घडला.
कृष्णा अच्युत मसुरकर हे कणकवली येथून मसूरे कावावाडी येथील आपल्या गावी जात असताना पिसेकामते येथे समोरून येणाऱ्या कारची धडक बसून कृष्णा अच्युत मसुरकर हे ठार झाले असून सोबतची महिला गंभीर जखमी झाली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कणकवली आचरा मार्गावर पिसेकामते कदमवाडी येथील वळणावर कारचालक प्रमोद बाबाजी मयेकर (रा. बांदीवडे सध्या.कणकवली) हे आपल्या ताब्यातील कार घेऊन कणकवलीच्या दिशेने येत होते यावेळी कृष्णा मसूरकर हे आपल्या मोटरसायकलने कणकवली होऊन मसूरे येथे जात होते. यावेळी समोरासमोर धडक बसून हा अपघात झाला. या अपघातात मोटरसायकल चालक कृष्णा मसुरकर हे जागीच ठरले. जमलेल्या वाहनचालकानी जखमी वैभवी विजय तोडणकर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले .घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस ठाण्याहून पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले . कृष्णा मसुरकर आणि त्यांची मेहुणी वैभवी हे रेल्वे आरक्षित तिकीट घेण्यासाठी कणकवली आले होते.वैभवी विजय तोडणकर या आपल्या वडिलांना घेऊन उद्या मुंबईला जाणार होत्या.त्यामुळे तिकीट घेऊन ते मसूरे येथे परतत असताना हा अपघात झाला.
