⚡मालवण ता.०६-: आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी यात्रा मार्गावर राज्य परिवहन मालवण आगारातून ४५ एसटी बसच्या माध्यमातून विविध गावातून दोन दिवस सतत फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते. यातून मालवण आगारास ७ लाख २५ हजार ४४ रुपये उत्पन्न मिळाले आहे, तर कुडाळ आगारातून २७ गाड्यांचे नियोजन करून त्यातून ५ लाख ६८ हजार ५७९ रुपयांचे उत्पन्न मिळाले, अशी माहिती मालवण व कुडाळ आगाराचे आगार व्यवस्थापक सचेतन बोवलेकर यांनी दिली आहे.
आंगणेवाडी यात्रेसाठी मालवण आगाराकडून ज्यादा वाहतुकीद्वारे तालुक्यातील विविध गावातून ४५ गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. यामध्ये १२ हजार १७८ किलोमीटर चालवून त्यातून ७ लाख २५ हजार ४४ रुपये उत्पन्न मिळाले. यात ५९.५४ पैसे प्रतिकिमी उत्पन्न व ९३.३६ येवढे भारमान मिळाले. विभाग नियंत्रक प्रशांत वासकर व विभागीय वाहतूक अधिकारी विक्रम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या जादा गाड्या व फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले. यात्रा कालावधीत कोणतीही बस मार्गस्थ बिघाड न झाल्याने यांत्रिक कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. यात्रा मार्गावर २७ हजार ३२१ भाविक प्रवाशांनी एसटी बस वाहतूकीचा लाभ घेतला.
तसेच कुडाळ आगारातून कुडाळ तालुक्यातील विविध गावातून २७ गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. यामध्ये ८०१६ किमी चालवून त्यातून ५ लाख ६८ हजार ५७९ रुपये एवढे उत्पन्न मिळाले. यात ७०.९३ रु. प्रति किमी उत्पन्न व ११६.१२ एवढे भरमान मिळाले. यात एसटीच्या २३ बस द्वारे ११० बसफेऱ्या मधून ५ लाख २ हजार ५७९ रु. इतके उत्पन्न मिळाले. तर विशेष बस सेवेकरिता ४ बसेस मधून ५१४ किमी व अनुत्पादित किमी ६८६ चालविण्यात आले, यामधून ६६ हजार रु. उत्पन्न मिळाले. एकूण २७ चालक व २३ वाहक असे एकूण ५० कर्मचारी यांचा वापर करण्यात आला. विभाग नियंत्रक प्रशांत वासकर व विभागीय वाहतूक अधिकारी विक्रम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही वाहतूक सेवा पार पडली. यात्रा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मालवण व कुडाळ या दोन्ही आगारातील चालक, वाहक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्रवाशांनी या वाहतुकीचा लाभ घेतल्याबद्दल आगार व्यवस्थापक सचेतन बोवलेकर यांनी आभार मानले.
