हरिहर नाचणोलकर यांचे निधन

ग्राहक चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते म्हणून होते परिचित

मालवण दि प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्राहक चळवळीचे अग्रणी मालवण फोवकांडा पिंपळ नजीक मेढा भागात राहणारे हरिहर महादेव नाचणोलकर (९३) यांचे सोमवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर आज चिवला बीच येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले

मालवण मेढा भागात राहणारे हरिहर नाचणोलकर हे सिंडीकेट बँकेमधून सेवानिवृत झाले होते. मालवण तालुका होमगार्डचे इन्चार्ज म्हणून अनेक वर्षे कार्यरत होते. १९८७-८८ मध्ये सावंतवाडी येथे ग्राहक चळवळीची पहिली शाखा सुरू करण्यासाठी मुंबई ग्राहक पंचायतीचे माधव मंत्री यांना खास निमंत्रीत करून त्यांनी ग्राहक चळवळ उभी केली होती. त्यानंतर अनेकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले होते. मालवण आणि जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्थांमध्ये त्यांनी सभासदत्व स्वीकारून त्यांना प्रशासकीयदृष्ट्या भक्कम करण्यासाठी मार्गदर्शन केले होते. वृद्धापकाळातही ते मार्गदर्शक म्हणून अनेकांना सल्ले देत असत श्री नाचणोलकर हे वृत्तपत्र वितरक म्हणूनही कार्यरत होते.

सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव किशोर नाचणोलकर यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.

You cannot copy content of this page