बांदा/प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगुडे नं. १ शाळेमध्ये ७४ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध सांस्कृतिक व गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झालेत. यावेळी विविध शैक्षणिक व क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.
कार्यक्रमाचे उदघाटन निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून संपन्न झाले. यावेळी उपसरपंच गौतम जाधव, माजी सरपंच समीर गावडे, जयराम गवंडे, माजी उपसरपंच गुरुदास गवंडे, आपा गावडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. नेहा पोखरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी नवनियुक्त सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रा.पं. सदस्य, माजी सरपंच, उपसरपंच व शाळेतून सेवानिवृत्त शिक्षिका सौ. उज्वला गावडे यांचा शाळेच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक श्री. नेमळेकर यांनी सत्कार केला.
उपशिक्षक श्री. असनकर यांनी शाळेच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडला. सर्वोत्कृष्ट विद्यार्थी, विविध केंद्र व तालुकास्तरीय स्पर्धेत उज्वल यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. यावेळी शाळेतील मुलांनी विविध वेशभूषा, नृत्य, गीतगायन, लोकनृत्य व कोकणातील माणसांच्या आपुलकीचा दशावतार नाटक असे वेगवेगळे कलागुण दाखवून उपस्थितांची वाहवा मिळवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग होंडे यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या उपशिक्षिका सौ. साक्षी कोलते, शाळेची माजी विद्यार्थीनी ऐश्वर्या राणे, पालक रोहिणी गावडे आदींनी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमांना ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो :-
निगुडे प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केलेत.
निगुडे नंबर १ शाळेत प्रजासत्ताक निमित्त विविध कार्यक्रम संपन्न
