श्रावण हनुमान घाटातील घटना
मालवण दि प्रतिनिधी
रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने उभ्या करून ठेवलेल्या डंपरमुळे श्रावण हनुमान घाटीच्या धोकादायक वळणावर चिरे वाहतूक करणाऱ्या डंपरचा अपघात झाल्याने तीन कामगार जखमी झाले असून जखमी कामगारांना अधिक उपचारासाठी कणकवली येथे हलविण्यात आले आहे.
दरम्यान, रस्त्याच्या कामाची ग्रीट खडी खाली करणारा डंपर चुकीच्या पद्धतीने उभा करून अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी डंपर चालकावर आचरा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही अपघाताची घटना शुक्रवारी घडली. जखमी कामगारांना अधिक उपचारासाठी कणकवली येथे हलवण्यात आले होते.
आचरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्याद देणारे नरेश सावंत रा आडवली हे आपल्या ताब्यातील एम एम ०७- सी-६७८९ मधुन आडवली येथून कणकवलीच्या दिशेने चिरेदगडाची कामगार लोकांसह वाहतुक करीत असताना श्रावण मारुतीची घाटी येथे एम एच ०७-एएफ-१०४५ ३ या डंपर मधून रस्त्याच्या कामाची ग्रीट खाली करण्यासाठी डंपर धोकादायक उतार असलेल्या वळणावर अविचारा हयगईने रस्त्यावर आडवे स्थितीत रस्ता पुर्णतः अडवून रस्त्यावरुन जाणाऱ्या येणाऱ्या इतर वाहनाच अपघात होईल अशा स्थितीत उभा करून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाना कोणतीही पूर्वसूचना न देता डंपर मधील ग्रीट खडी खाली करीत होता. यावेळी सावंत यांचा डंपर वळणावर आला असता त्याना अचानक रस्त्यावर आडवा लावलेला डंपर दिसला त्यामुळे त्यांनी अपघात टाळण्यासाठी डंपरचा ब्रेक दाबुन डंपर बाजुला घेतला त्यामुळे त्यांचा डंपर रस्त्याच्या बाजुला चरीत जावुन घळणीवर आदळून अपघात झाला. या अपघातात डंपरमधील कामगार मुकेश कुमार, सबीद बारला, बात्रा बारला हे गंभीर जखमी झालेत. रस्त्यावर धोकादायक स्थितीत डंपर लावून अपघातास कारणीभूत ठरलेल्या ग्रीटखडी वाहतूक करणारा डंपर चालक रवींद्र देऊ कुवळेकर वय ५४ रा वागदे यांच्यावर आचरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
