⚡कणकवली ता.२८-: जि. प.पूर्ण प्राथमिक शाळा पोखरण नं. १ च्या मुलींनी महान पौराणिक दशावतार पुनर्जन्म आपल्या सहज सुंदर नैसर्गिक अभिनयाने बिडवाडी येथील गणेश मंदिरात गणेश जयंतीच्या निमित्ताने पहिला प्रयोग सादर केला.
या दशावतार नाटकांमध्ये यम धर्माची भूमिका लावण्या सावंत ,जान्हवीच्या भूमिकेत प्रीती डोईफोडे ,सरस्वती ब्राह्मणाची भूमिका दीक्षा शिंदे, इंद्रदेवाच्या भूमिकेत मित्तल सावंत, मंजू गोषा अदिती सावंत, ब्रह्मदेव मैत्राली गुरव, शंभू महादेवाच्या भूमिकेत वृंदा सावंत, विष्णू श्रुती मर्गज आणि रेवळनाथांच्या मध्यवर्ती भूमिकेत हर्षदा गावकर काम करते आहे. सहज आणि नैसर्गिक अभिनयाने या सर्व कलाकारांनी प्रेक्षकांवर छाप पाडली. इयत्ता पाचवी ते सातवीमध्ये शिकणाऱ्या दहा ते बारा वर्षे वयोगटातील या बालकलाकारांनी एक उत्कृष्ट प्रयोग सादर केला. या नाटकासाठी संवादिनीसाठी तुळशीदास सावंत, पखवाजसाठी छगन सावंत तर झांजसाठी अर्जुन कोरगावकर यांनी साथ दिली. या नाटकाचे दिग्दर्शन प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक सागर मेस्त्री करत असून त्यांना विजय गुरव आणि शामसुंदर सावंत मदत करत आहेत. रंगभूषेसाठी प्रशांत सुतार, वेशभूषा प्रतिक्षा कदम ,गायत्री बागवे आणि राधिका परूळेकर यांची आहे.या प्रयोगासाठी पालकवर्ग, ग्रामस्थ आणि बिडवाडी पंचक्रोशीतील लोक उपस्थित होते.
