जोतिबांची सावित्री बनणे” आजच्या काळाची गरज

ॲड. स्वाती तेली;ओसरगाव येथे ”महिलांचा स्नेहसंमेलन व तिळगुळ समारंभ कार्यक्रम

⚡कणकवली ता.२८-: स्त्रियांना समाजामध्ये सन्मान आणि प्रतिष्ठापूर्वक जगण्यासाठी ही मूल्ये आवश्यक आहेत. स्त्रियांची प्राचीन काळापासून खूपच वाईट अवस्था होती ती आज ही तशीच झाली असती, आज जे काही स्त्रियांना स्थान आणि मान आहे तो केवळ ज्योतिबा फुले आणि सवित्रीमाई फुले यांच्या मुळे म्हणून आपण सत्यवानाची सावित्री बनण्यापेक्षा ज्योतिबाची सावित्री बणने काळाची गरज आहे असे मत ॲड. स्वाती तेली यांनी साद फाउंडेशन आयोजित ओसरगाव येथील कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून बोलताना व्यक्त केले.

प्रजासत्ताक दिनानिमित्त महिलांचे स्नेहसंमेलन व तिळगुळ समारंभ आयोजित करून स्त्रियांना त्यांच्या हक्क ,अधिकार , कर्तव्ये यासाबंधी कायदेविषयक मार्गदर्शन सत्राचे आयोजन साद फाउंडेशन, सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने पूर्ण प्राथमिक शाळा,कानसळीवाडी ,ओसरगाव येथे करण्यात आले होते. यावेळी मुख्याध्यापिका शीतल ठाकूर , नंदकिशोर हरमळकर गुरुजी,उपसरपंच गुरूदास सावंत, साद च्या अध्यक्षा गितांजली नाईक, युनिक अकॅडमी कणकवली संचालक सचिन कोर्लेकर, ॲड.स्वाती तेली, उद्योजिका वर्षा तळेकर, प्रा.अपूर्वा गोलतकर, डिगस शाळेचे मुख्याध्यापक विलास गोसावी, सेजल कदम आदी मान्यवर यांच्यासह सर्व महिला व विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
ॲड.तेली म्हणाल्या की, महिलांसाठी कायदे बनवले गेले आहेत त्याचा वापर योग्य वेळी योग्य ठिकाणी कारायलाच हवा. महिलांनी अन्याय, अत्याचार सहन करू नये ,संविधानाने महिलांना त्यांचे हक्क अधिकार दिले,
तसेच आपण नटून थटून दागीने घालून विवाहित स्त्रिया जो हळीकुंकू समारंभ साजरा करतात तो विधवा महिलांचा अपमान करणारा आहे का? असा प्रश्न पडतो कारण स्त्री म्हटली की ती कुठलीही असली तरी स्त्री असते. नवरा मरणे हा तिचा दोष नसतो त्यामुळे या सर्व महिलांना कार्यक्रमात सहभागी करून घेण्याचं महत्वाचं काम हे कुटुंबातील महिलांनी करायला हवं. तसेच या महिलांची मानसिकता बदलणेही गरजेचे आहे.

यावेळी साद फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि कुडाळ नगरपंचायत प्रशासकीय अधिकारी गितांजली नाईक म्हणाल्या, साद फाउंडेशन सिंधुदुर्ग च्या वतीने हा कार्यक्रम घेण्याचा उद्देशच हा आहे की, स्त्रिया त्यांच्या अधिकाराबद्दल जागरूक झाल्या पाहिजेत. आज विधवा स्त्रियांना जी वागणूक मिळते ती मानसिकता खूपच वेदनादायक आहे. विधवा स्त्रियांना ही सन्मानाने वागवले पाहीजे. अनेक रूढी परंपरा यामध्ये अडकलेल्या भारतीय समाजात पुरुषां पेक्षा स्त्रियांवरच जास्त जबाबदाऱ्या दिसतात. तीने आज ही चुल आणि मुल याकडेच लक्ष द्यायचे? तसेच पुरुषांनी स्त्रियांना त्यांच्या कामात मदत केली तर पुरुषांना हिणवले जाते ही कुठली मानसिकता? याचा विचार करायला हवा. यासाठी आपल्या देशासह, गावागावात अशा अनेक विषयांवर चिंतन आणि प्रबोधन होणे गरजेचे आहे.

याप्रसंगी सादच्या माध्यमातून सर्व महिलांना एक झाडाचे रोपटे व तिळगुळ देऊन सन्मान केला गेला. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा क्षेत्र लहानपणापासूनच समजून घेतलं पाहीजे यासाठी राजमुद्रा, युपीएससी, मी आणि तुम्ही, मुलांना घडवताना अशी तीन पुस्तके शाळेच्या मुख्याध्यापिका शीतल ठाकूर , नंदकिशोर हरमळकर यांच्याकडे भेट स्वरूपात देण्यात आली.
आज जे मार्गदर्शन करण्यात आले ते सर्व स्त्रियांनी आचरणात आणावे असे आवाहन प्रा.अपूर्वा गोलतकर यांनी केले.
ॲड.स्वाती तेली यांनी सर्व कायदे व्यवस्थित आणि ग्रामीण भागातील महिलांना समजेल अशा भाषेत समजावून सांगितले.

संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उद्योजिका वर्षा तळेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन व सर्वांचे आभार नंदकिशोर हरमळकर यांनी मानले.

You cannot copy content of this page