⚡मालवण ता.२३-: प्रा. मधु दंडवते यांनी बॅ. नाथ पै यांचा वारसा पुढे सुरू ठेवताना अनेक युवक, ज्येष्ठ मंडळींना सामाजिक कार्यात पुढे आणले. सिंधुदुर्गात जन्माला आलेले नाथ पै हे आपल्या कार्याने भारताचे सुपुत्र झाले हे जिल्ह्यासाठी आजही भूषणावह आहे. त्यांच्या प्रेरणादायी कर्तृत्वाने प्रा. मधु दंडवते घडले. सामाजिक कार्य करताना निष्ठा जपणारा नेता म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. प्रा. दंडवतेंसारखा थोर विचारवंत पुन्हा होणे नाही. त्यामुळे प्रा. दंडवतेचे विचार समाजात जीवंत ठेवण्याचे काम सेवांगण करत आहे हे आपल्यासाठी अभिमानास्पद आहे, असे प्रतिपादन मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष अॅड. देवदत्त परुळेकर यांनी कट्टा येथे केले.
कट्टा केंद्रशाळा नं. १ येथे मालवण येथील बॅ. नाथ पै. सेवांगणतर्फे प्रा. मधु दंडवते जन्मशताब्दी सोहळ्याचा शुभारंभ झाला. दीप प्रज्वलन तसेच स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा शाखेतर्फे दिला जाणारा बापूभाई शिरोडकर स्मृती आदर्श समाजसेवक पुरस्कार ‘माझे आजोळ’ या सेवाभावी संस्थेचे संस्थापक भरत भोगटे यांना देऊन सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. देवदत्त परुळेकर होते. संस्थेचे कार्याध्यक्ष दीपक भोगटे, बँक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त शाखाधिकारी रमेश म्हाडगूत, माझे आजोळ सेवाभावी संस्थेचे संस्थापक भरत भोगटे, सरपंच शेखर पेणकर, सेवांगण कट्टा शाखाध्यक्ष किशोर शिरोडकर, बाबूकाका अवसरे, अविनाश म्हाडगूत, बापू तळावडेकर, अरविंद नेवाळकर, बाळा महाभोज, अरविंद शंकरदास, ग्रा.पं. सदस्य वंदेश ढोलम, प्रशांत टेंबुलकर आदी उपस्थित होते.
सत्कारमूर्ती भरत भोगटे म्हणाले, आजचा क्षण हा माझ्यासाठी खूप सुखद आहे. सेवांगणचे कार्य प्रेरणादायी आहे. समाजात काम करताना आपण समाजाचे काही देणे लागतो, या हेतूने समाजात वावरा व प्रामाणिक कार्य करा. सेवांगणने हाती घेतलेला सामाजिक कार्याचा वसा कौतुकास्पद असून तुमच्या कार्यास माझा सलाम, असे गौरवोद्वार त्यांनी काढले. विनम्र, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून काम केलेले भरत भोगटे आजही समाजात मदतीसाठी तत्पर आहेत. समाजकार्याची आवड असलेले व्यक्तिमत्व ही त्यांची ओळख कायम राहवी, असे रमेश म्हाडगूत म्हणाले. प्रास्ताविकात कार्याध्यक्ष दीपक भोगटे यांनी कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. दंडवते या महान व्यक्तिमत्वाची जन्मशताब्दी साजरी करायला मिळणे हे आपले सर्वांचे भाग्य आहे, असे सांगितले. प्रा. दंडवते यांच्यासोबत सामाजिक कार्यात काम केलेल्या अनेक ज्येष्ठ मंडळींसह नवनिर्वाचित सरपंच शेखर पेणकर व ग्रा.पं. सदस्य प्रशांत टेंबुलकर व वंदेश ढोलम व उत्कृष्ट प्रोग्रॅमर म्हणून राज्यस्तरीय पारितोषिक मिळविणाऱ्या श्रद्धा गिरकर यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन बाळकृष्ण नांदोसकर यांनी, तर आभार वैष्णवी लाड यांनी मानले.
