वायंगणी माळरानावर सापडला अर्धवट जळलेला मृतदेह

⚡मालवण ता.२१-: मालवण तालुक्यातील वायंगणी माळरानावर शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडून आला असून यामुळे खळबळ उडाली आहे. हा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत असल्यामुळे त्याची ओळख पटवणे मुश्किल बनले आहे. मृतदेहाच्या स्थितीवरून घातपाताचा संशयही व्यक्त केला जात असून याचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

दरम्यान, याबाबत पोलीस अधिक तपास करत असून मृतदेहापासून काही अंतरावर एक आधारकार्ड मिळून आले आहे. त्यावरून मृताची ओळख पटवण्याचे काम पोलीस करीत आहेत.

शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा मृतदेह सापडून आल्यानंतर याबाबत माहिती मिळताच आचरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याठिकाणी तपास सुरु असून उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे हे देखील घटनास्थळी दाखल झाले. तर अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक भोसले यांनीही घटनास्थळी भेट दिली.

हा मृतदेह अर्धवट जळलेल्या अवस्थेत असून मृतदेहाच्या नजीक पाण्याची बाटली, काही औषधे देखील मिळून आली आहेत. तर काही अंतरावर एक आधारकार्ड मिळून आले आहे. त्या आधारे मृताची ओळख पटवण्याचे काम पोलीस करीत आहेत. सदरील आधारकार्ड मालवण येथील मूळ रहिवाशी असलेल्या व्यक्तीचे असून कामानिमित्त तो पुणे येथे वास्तव्यास असतो. हा इसम १३ जानेवारी पासून बेपत्ता असून याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे समजते. सदरचा मृतदेह त्याच व्यक्तीचा आहे का? याचा पोलीस अधिक तपास करत आहेत. या व्यक्तीचा घातपात झाला की आत्मघात याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

You cannot copy content of this page