मुंबईत 17 रोजी कवी अजय कांडर यांची प्रकट मुलाखत

मुंबई लोक सांस्कृतिक मंचचे आयोजन

⚡कणकवली ता.१५-: लोक सांस्कृतिक मंच मुंबईतर्फे प्रसिद्ध कवी अजय कांडर यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन सोमवार १७ जानेवारी रोजी सायं. ५ वा. ५ /इ एन्सा हटमेंट,सी आय टी यु युनियन कार्यालय,
पत्रकार भवना जवळ आझाद मैदान पोलीस स्टेशन समोर, मुंबई येथे आयोजन करण्यात आले आहे.
कवी अजय कंडर हे मराठीतील आजचे महत्त्वाचे कवी आहेत. त्यांनी विचारशीलपणे व्यवस्थित हस्तक्षेप करणारी कविता लिहिली. यामुळे त्यांची कविता आजच्या शतखंडित जगण्यावर भाष्य करू शकली. सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय प्रदूषित होत जाणाऱ्या आजच्या पर्यावरणात त्यांच्या कवितेने हत्ती इलो, युगानुयुगे तूच, अजूनही जिवंत आहे गांधी आदी दीर्घ कवितांमधून कठोर भाष्य केले. तर आवानओल सारख्या काव्यसंग्रहमधून सर्व दूर पसरलेल्या खेड्यातील कष्टकरी बायांची वेदना सार्वकालिक केली. यातील अनेक कविता विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांमध्ये समावेश करण्यात आल्या. तर त्यांच्या तीन काव्यसंग्रहांवर स्वतंत्र नाटके रंगभूमीवर सादर करण्यात आली. त्यांच्या कविता हिंदी, इंग्रजी, मल्याळम, उर्दू, दख्खनी बोली आदी भारतीय भाषांमध्ये अनुवादित झाली असून त्यांना महाराष्ट्र फाउंडेशन, जैन उद्योग समूहाचा बालकवी पुरस्कार, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा विशाखा पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, इंदिरा संत पुरस्कार आदी प्रतिष्ठित 26 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या पार्श्वभूमीवर त्यांच्या या सदर मुलाखतीचे आयोजन करण्यात आले असल्याचे संयोजकांतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
या मुलाखती दरम्यान त्यांच्या काव्य वाटचालीविषयी, त्यांच्या काव्य जाणीवांविषयी, त्यांच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय लेखन पर्यावरण विषयी प्रश्न विचारले जाणार असून या कार्यक्रमात साहित्य रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहनमुंबई लोक सांस्कृतिक मंचचे पदाधिकारी आणि या कार्यक्रमाचे संयोजक सुबोध मोरे, प्रमोद पवार, मुक्तार खान आणि राजीव देशपांडे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page