⚡मालवण ता.१३-: मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण संचालित कौटुंबिक सल्ला केंद्र आणि दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान मालवण नगरपरिषद द्वारा स्थापित जय भवानी वस्ती स्तर संघ, देऊळवाडा मालवण व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने देऊळवाडा, मालवण येथे महिला प्रबोधन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांना मार्गदर्शन केले.
प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जय भवानी वस्ती स्तर संघ, देऊळवाडा मालवण च्या अध्यक्षा नीना मुंबरकर, संकल्प शहर स्तर संघ, मालवणच्या अध्यक्षा सौ. संजना मांजरेकर, मालवण नगरपरिषदेचे कोऑर्डीनेटर खेमराज सावंत, मनोजकुमार गिरकर, समुपदेशक आणि कौटुंबिक सल्ला केंद्राचे समुपदेशक विजय कुडाळकर हे उपस्थित होते.
नीना मुंबरकर यांनी पाहुण्यांचे स्वागत करुन कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सावित्रीबाई यांनी स्वतः समाजा कडून झालेली सर्व प्रकारची अवहेलना सहन करुन मुलींना शिक्षण सुरू केले. म्हणून आज मुली उच्च शिक्षण घेऊन उच्च पदावर नोकरी करुन आपले कुटुंब सुद्धा सांभाळत आहे. सावित्री बाई यांचे योगदान आपण कधीच विसरू शकणार नाही, असे मुंबरकर यांनी सांगितले.
मनोजकुमार गिरकर यांनी मुलांना वाढवताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे, हे सांगून मुलींप्रमाणे मुलांनाही आज घर कामात मदत करण्यास शिकवावे. मुलगा मुलगी हा भेदभाव न करता त्यांना समान वागणूक द्यावी असे सांगत मार्गदर्शन केले. तर खेमराज सावंत यांनी बचत गटासाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. संजना कांबळी यांनी महिलांचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल याची माहिती दिली.
मनोजकुमार गिरकर यांनी गेली अनेक वर्ष समुपदेशक म्हणून काम केल्याबद्दल जय भवानी वस्ती स्तर संघ यांच्या वतीने शाल आणि श्रीफळ देवून सुहास वालावलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर महिलांसाठी विविध फनी गेम्स घेवून विजेत्या महिलांना बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली कांबळी यांनी करत आभार मानले.
