मालवणच्या टोपीवाला हायस्कुलच्या स्नेहसंमेलनात ‘वनराई’चे नेपथ्य ठरले आकर्षण

⚡मालवण ता.१२-: मालवण येथील टोपीवाला हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात यावर्षी पर्यावरण पूरक नेपथ्य साकारण्यात आले. शाळेचे कलाशिक्षक बी. जी. सामंत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या नेपथ्यात रंगभूमीवर हिरव्या वनराईचे चित्र रेखाटत ‘झाडा लावा झाडे जगवा’ असा संदेश नेपथ्याच्या माध्यमातून हटके देण्यात आल्याने तो एक कौतुकाचा विषय बनला

मालवण येथील टोपीवाला हायस्कुलचे स्नेहसंमेलन मामा वरेरकर नाट्यगृहात संपन्न झाले. या शाळेच्या स्नेहसंमेलनात गेली १०- १२ वर्षे पर्यावरण पूरक नेपथ्य साकारण्यात येत आहे. यापूर्वी जुन्या सीडी वापरून, जुन्या जाळ्यांचा वापर करून, कोलाज करून नेपथ्य निर्माण करण्यात आले होते. या नेपथ्यातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येतो. यावर्षी हिरव्या वनराईचे महत्व ठळकपणे विद्यार्थ्यांच्या लक्षात यावे हा उद्देश ठेवून कलाशिक्षक बी. जी. सामंत यांच्या संकल्पनेतून वनराईचे चित्र रंगभूमीवर साकारण्यात आले. बी. जी. सामंत यांनी राखी अरदकर, निहार सापळे, मानसी करलकर, आदित्य मोंडकर, ओम गोलतकर या विद्यार्थ्यांच्या मदतीने १६०× ४ आकाराच्या पुठ्ठ्यावर वनराईचे आकर्षक चित्र साकारत नेपथ्य निर्माण केले. यामध्ये मालवणातील जेष्ठ मखरकार सदा चुरी, बाबू किनळेकर, पराग परब, विठ्ठल लांबर यांचे सहकार्य लाभले. या शाळेच्या प्रत्येक विभागाच्या स्नेहसंमेलनात या पर्यावरण पूरक नेपथ्याची माहिती निवेदकांकडून देऊन पर्यावरण संवर्धन विषयक संदेश विद्यार्थी व पालकांना देण्यात आला. या आकर्षक नेपथ्याचे सर्वांनीच कौतुक केले.

You cannot copy content of this page