साळेल मधील त्या कोंबड्याचा मृत्यू गुदमरून

शवविच्छेदन अहवालात स्पष्ट ; मालवण पंचायत समिती प्रशासनाने घेतली तात्काळ दखल

*💫मालवण दि.१०-:* मालवण तालुक्यातील साळेल गावात घरगुती कुक्कुटपालन प्रकल्पातील चार कोंबड्या एकाच वेळी दगावल्याचा प्रकार समोर आल्यानतर मालवण पंचायत समिती प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन घटनेचा पशुसंवर्धन विभागाकडून पंचनामा करून कोंबड्याचे शवविच्छेदन केले असता त्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. साळेल गावात बुधवारी एका घरगुती कुक्कुटपालन प्रकल्पातील चार कोंबड्या मृत पावल्याची माहिती पंचायत समिती प्रशासनाला प्राप्त झाली. त्यानुसार गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे यांनी तात्काळ पाहणी करून पुढील कार्यवाही करण्याचे आदेश पशु संवर्धन विभागाला दिले. त्यानुसार डॉ. रवींद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली डॉ. तुषार वेर्लेकर यांचे पथक साळेल गावात दाखल झाले. मृत कोंबड्याची पंचनामा करून शवविच्छेदन करण्यात आले. यात कोंबड्यांचा गडमरून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. कुक्कुटपालनाची जागा लहान असून त्यात अधिक संख्येने त्यांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात आली. अस्तित्वात असलेल्या कोंबड्याना कोणताही आजार अथवा लक्षणे दिसून येत नव्हती. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये, असे आवाहन पशु संवर्धन विभागाने केले आहे. मालवण तालुक्यात ज्या ठिकाणी पोल्ट्री फार्म, घरगुती कुक्कुटपालन केले जाते, त्याठिकाणी कोंबड्यांना वेळीच लसीकरण करावे. कुक्कुटपालनाचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करावे. पशु संवर्धन विभागाने दिलेल्या सूचना व आदेशाचे पालन करावे, असे आवाहन पशु संवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page