देवबाग बसफेरीच्या समस्या न सोडविल्यास आमरण उपोषण – सुरेश बापर्डेकर

⚡मालवण ता.२४-: मालवण – देवबाग एसटी बस फेरीबाबत प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून त्यांची गैरसोय होत आहे. या समस्यांबाबत ग्रामस्थ विद्यार्थी यांनी आवाज उठवूनही आगार व्यवस्थापनाकडून उपाययोजना होत नसून मालवण आगारप्रमुखांकडून तारकर्ली देवबाग ग्रामस्थांना वेठीस धरले जात आहे, असा आरोप तारकर्ली मधील सामाजिक कार्यकर्ते आणि भाजप कोकण विकास आघाडी, मुंबईचे सचिव सुरेश बापर्डेकर यांनी करत येत्या पंधरा दिवसात मालवण देवबाग मार्गावरील प्रवाशांची होणारी गैरसोय दूर न केल्यास मालवण एसटी आगार कार्यालयासमोर जन आंदोलन करून आमरण उपोषण करू, असा इशारा प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

मालवण – देवबाग बस फेऱ्यांच्या वेळेबाबत कोणतेही ठोस नियोजन नसल्याने देवबाग तारकर्ली भागातील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. बसला विलंब होणे, अचानक बस फेरी रद्द होणे असे प्रकार घडत असून काही वेळा बस उपलब्ध नसल्याने इतर गावावरून आलेली बस देवबाग साठी सोडण्याची तडजोड केली जात आहे. यामुळे अनेक वेळा प्रवाशांना बसच्या प्रतीक्षेत स्थानकात तासन तास ताटकळत राहावे लागत आहे, तर देवबाग रस्त्यावर मोठ्या बस सोडण्यात येत असल्याने वाहतूक खोळंबा होत असून मिनी बस सोडण्याच्या मागणीकडेही दुर्लक्ष होत आहे. देवबाग फेरी बरोबरच मालवण आगारातून सुटणाऱ्या इतर अनेक बस फेऱ्यांच्या बाबतीतही गाड्या एक दोन तास उशिरा सोडण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागतो व नाहक भुर्दंड त्यांना पडतो. मात्र प्रवाशांच्या मागण्यांकडे एसटी प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत, असेही सुरेश बापर्डेकर यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page