विद्यार्थी,शिक्षक, स्थानिक ग्रामस्थांशी साधला सुसंवाद
⚡कणकवली ता.२४-: मुंबई विद्यापीठाचे नवनियुक्त प्रभारी कुलगुरू प्रा.डॉ. दिगंबर शिर्के यांनी तळेरे येथील
मुंबई विद्यापीठाच्या विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली.
याभेटीत त्यांनी विद्यार्थी,शिक्षक, स्थानिक ग्रामस्थ यांच्याशी सुसंवाद साधला. त्यांच्या समवेत डॉ. नंदकुमार मोरे (सहयोगी प्राध्यापक व मराठी विभाग प्रमुख, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर) श्री.श्रीपाद वेलिंग (प्रभारी संचालक, सिंधुदुर्ग उप-परिसर व समन्वयक, दळवी महाविद्यालय तळेरे) हे उपस्थित होते.
यावेळी महाविद्यालयाचे मानद मार्गनिर्देशक मा.विनायक दळवी यांनी शब्दबद्ध केलेले महाविद्यालय गीत विद्यार्थ्यांनी गायले.
यावेळी बोलतांना प्रभारी कुलगुरू डॉ.शिर्के म्हणाले, विद्यार्थ्यांनी नवनवीन कौशल्य आत्मसात करून कम्युनिकेशन स्किल्स वाढवावी, महाविद्यालयातून चांगले विद्यार्थी घडावेत आणि खऱ्या अर्थाने आदर्श महाविद्यालय व्हावे” अशी अपेक्षा व्यक्त केली.
मा.श्रीपाद वेलींग या वेळी बोलतांना म्हणाले, कुलगुरूसरांची ही सदिच्छा भेट आहे. तीन विद्यापीठांचा कारभार ते पाहत आहेत,धावपळीच्या वेळी, वेळात वेळ काढून विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी, आपल्या विनंतीला मान देवून ते या ठिकाणी आले, विद्यार्थ्यांशी संवाद साधला, समस्या जाणून घेतल्या याबद्दल त्यांचे आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नितीश गुरव यांनी केले.
