त्यामुळे हायमास्ट दुरुस्तीचा नारळ फोडला;सन्मेश परब, तपस्वी मयेकर, पंकज सादये यांचा आरोप
⚡मालवण ता.२२-: दांडी येथील जो हायमास्ट टॉवर प्रकाशमान केला याचा बागुलबुवा माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर करत आहेत. तो हायमास्ट टॉवर स्थानिक शिवसेना नगरसेवकांनी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमांतून उभारला आहे. मालवण शहराच्या मत्स्य व्यवसायाचे प्रमुख केंद्र असलेल्या दांडी आवार या मासे लिलाव ठिकाणी २५ वर्षाच्या नगरसेवक व नगराध्यक्ष काळात आचरेकर याठिकाणी लाईट व्यवस्था करू शकले नाही. मात्र हायमास्ट दुरुस्ती कामाचा नारळ आचरेकर यांना फोडावा लागतो. यावरून शिवसेनेच्या नगरसेवकांनी या भागात केलेल्या कामाची आचरेकर यांनी धास्ती घेतली हे समजून येते अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे संमेश परब, तपस्वी मयेकर, पंकज सादये यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.
दांडी आवार येथील बंद पडलेल्या हायमास्ट टॉवरची दुरुस्ती करण्यात आल्यानंतर या दुरुस्तीवरून शिवसेना व भाजप यांच्यात हेवेदावे सुरू आहेत. माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर व माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी ही दुरुस्ती आपण केल्याचा दावा करत शिवसेनेच्या माजी नगरसेवकांवर टीका केली होती. त्यास नागरिक विली डीसोजा व विकी चोपडेकर यांनी दुजोरा दिला होता. यानंतर ठाकरे शिवसेनेचे संमेश परब, तपस्वी मयेकर व पंकज सादये यांनी प्रसिद्धीपत्रकातून प्रत्युत्तर दिले आहे.
सुदेश आचरेकर यांच्या प्रभागातील बेवडा बिल्डिंग ते काळबादेवी मंदिर या रस्त्याच्या कामासाठी त्या भागातील नागरिकांनी आमदार वैभव नाईक यांच्या जवळ बैठक लावून मागणी केली. ती मागणी पूर्ण झाल्याने आचरेकर हतबल झाले आहेत. आम. नाईक यांच्या माध्यमातून शहरात आणलेली विकासकामे अडविण्याचा एककलमी कार्यक्रम आचरेकर करत आहेत. महाराष्ट्र मध्ये सत्ता बदल होऊन ६ महिने झाले. केंद्रात ३ वर्ष मंत्री पद आहे. या माध्यमातून मालवण शहरासाठी किती निधी आचरेकर यांनी खेचुन आणला ते जाहीर करावे. आचरेकर यांना जनता ओळखून असून आगामी निवडणुकीत जनता त्यांना जागा दाखविल्या शिवाय राहणार नाही, असेही संमेश परब, तपस्वी मयेकर, पंकज सादये यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
