कणकवली पर्यटन महोत्सवात सारेगमप फेम गायकांसोबत हास्यजत्रेचे कलाकार येणार

⚡कणकवली ता.२१-: कणकवली पर्यटन महोत्सव ५ जानेवारीपासून सुरू होत आहे. गुरुवार दि. ५ जानेवारी ते रविवार दि. ८ जानेवारी, २०२३ या कालावधीत संपन्न होत असणाऱ्या कणकवली पर्यटन महोत्सवासाठी मालिकाविश्वातील अनेक नामवंत कलावंत हजेरी लावणार असून प्रेक्षकांना हास्याची अन् संगीताची सुरेल मेजवानी मिळणार आहे.

गुरुवार ५ जानेवारी २०२३ रोजी कणकवली पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन होणार असून या उद्घाटन समारंभानंतर सायंकाळी ७.३० वा. टी. व्ही. विश्वातील कलाकारांचा धमाल कॉमेडी शो आणि बेधुंद संगीत रजनी कार्यक्रम होणार आहे. यावेळी ‘सारेगम’ फेम सावनी रविंद्र, कविता राम, विश्वजित बोरवणकर यांची सुरांची मैफिल रंगणार असून त्यानंतर महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, चेतना भट, शामसुंदर राजपूत यांच्या धमाल विनोदाची मेजवानी रसिकांना चाखता येणार आहे. ऐश्वर्या पवार या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार असून या सांगीतिक आणि विनोदाच्या पर्वणीला सर्व रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page