ठाकरे गटाचे दोन, शिंदे गटाचा एक सरपंच विराजमान
वैभववाडी प्रतिनिधी
वैभववाडी तालुक्यातील निवडणूक झालेल्या ११ ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल मंगळवारी लागला आहे. यापैकी नेर्ले, हेत, उंबर्डे, नापणे, करुळ, सडुरे, कुर्ली, नानिवडे या ८ ग्रामपंचायतीवर भाजपचे सरपंच तर कोळपे, तिरवडे तर्फ खारेपाटण या २ ग्रामपंचायतीवर शिवसेना ठाकरे गट, तसेच नावळे ग्रामपंचायतीवर शिवसेना शिंदे गटाचे सरपंच विराजमान झाले आहेत. तर अगोदर ६ बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती पैकी जांभवडे, तिथवली, अरुळे, निमअरुळे, उपळे या ५ भाजप तर गडमठ ग्रामपंचायत ही ग्रामविकास पॕनलने ताब्यात घेतली आहे.
त्यामुळे एकूण १७ पैकी १३ भाजप, शिवसेना ठाकरे गट २ , तर १ शिवसेना शिंदे गट आणि एक ग्रामविकास आघाडीकडे अशी विभागणी झाली आहे. अतिशय अटीतटीच्या लढतीत तिरवडे तर्फ खारेपाटण येथे भाजपचे योगेश पाथरे व शिवसेनेचे जितेंद्र तळेकर यांना समसमान मते मिळाली. त्यामुळे याठिकाणी चिठ्ठी टाकण्यात आली. यात तळेकर विजयी झाले आहेत.
मंगळवारी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. त्या अगोदरच उमेदवार व त्यांचे समर्थक व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांनी वैभववाडी शहरात गर्दी केली होती. उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये निकालाबाबत कमालीची उत्सुकता दिसून येत होती. एक एक निकाल जसा जाहीर होत होता. तसे तसे फटाक्यांचे आवाज व कार्यकर्त्यांचा जल्लोष होत होता.
