मोठा पक्ष ठरला भाजप
ठाकरे सेनेला केवळ ९ ठिकाणी सत्ता
सावंतवाडी । प्रतिनिधी : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची सेमी फायनल म्हणून पहिल्या जात असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश प्राप्त झाले. सावंतवाडी तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींपैकी ३४ ग्रामपंचायतीवर भाजपला निर्विवाद वर्चस्व प्राप्त करता आले. तर बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटाने तीन ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकवला. अपक्ष ३ तर गाव विकास पॅनल २ व राष्ट्रवादीने एका ग्रामपंचायतीवर यश मिळवले. मात्र, मोठा डंका पिटणाऱ्या ठाकरे सेनेचा सुपडा साफ झाला असून त्यांना केवळ ९ ग्रामपंचायतीवर विजय प्राप्त करता आला. त्यामुळे सावंतवाडी तालुक्यात भाजपचेच वर्चस्व असल्याचे या निकालांमधून पुन्हा एकदा सिद्ध झाले.
सावंतवाडी तालुक्यात बिनविरोध झालेल्या ८ ग्रामपंचायतींपैकी ७ ग्रामपंचायतींवर भाजपने यापूर्वीच यश प्राप्त केले होते. त्यानंतर निवडणूक झालेल्या ४५ ग्रामपंचायतींपैकी २७ ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला. त्यामुळे तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींपैकी तब्बल ३४ ग्रामपंचायतीवर भाजपने निर्विवाद यश प्राप्त केले आहे. यात आजगांव सातोसे तांबोळी नेतर्डे किनळे साटेली वाफोली नाणोस कवठणी मडुरा न्हावेली पडवे माजगाव बांदा सरमळे माजगाव रोणापाल कास शेर्ले डेगवे गेळे वेर्ले शिरशिंगे देवसू ओवळीये केसरी -फणसवडे विलवडे सांगेली सावरवाड कुणकेरी आंबेगाव कारिवडे भालावल व कोनशी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
तर निरवडे सोनुर्ली व सातोळी बावळाट, ओटवणे या ग्रामपंचायतींवर गाव विकास पॅनल ची सत्ता आली आहे. यातील काही ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने आपला दावा केला आहे. तर निगुडे व तळवणे या गावात अपक्ष सरपंच निवडून आले आहेत. ठाकरे सेनेला केवळ सातार्डा कलंबिस्त वेत्ये नेमळे पाडलोस चराठा व धाकोरे या ग्रामपंचायतीवर विजय मिळवता आला. यातीलही काही ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात येतील असा दावा भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे.
सरपंच पदाचे विजयी उमेदवार
१.आंबेगाव : शिवाजी परब, भाजप
२.असनिये : रेश्मा सावंत, गाव विकास
३.बांदा : प्रियांका नाईक, भाजप
४.भालावल : समीर परब, भाजप
५.भोमवाडी : अनुराधा वराडकर, मविआ
६.चराठे : प्रचिती कुबल, गाव विकास
७.डेगवे : राजन देसाई, भाजप
८.देवसू दाणोली : चंद्रोजी सावंत, भाजप
९.धाकोरे : स्नेहा मुळीक, ठाकरे सेना
१०.गुळदुवे : शैलेंद्र जोशी,गाव विकास
११.कलंबिस्त : सपना सावंत, ठाकरे सेना
१२.कारीवडे : आरती माळकर, भाजप
१३.कास : प्रवीण पंडित, भाजप
१४. कवठणी : अजित कवठणकर भाजप
१५.केसरी फणसवडे : स्नेहल कासले, भाजप
१६.किनळे : दिपक नाईक, भाजप
१७.कोनशी दाभिळ : साधना शेट्ये, भाजप
१८.कुणकेरी : सोनिया सावंत, भाजप
१९.माडखोल : श्रृश्नवी राऊळ, भाजप
२०.मडुरा : उदय चिंदरकर, भाजप
२१.माजगाव : अर्चना सावंत ,भाजप
२२.नाणोस : प्राजक्ता शेट्ये, भाजप
२३.नेमळे : दिपाकी भौरे, ठाकरे सेना
२४.न्हावेली : अष्टविनायक धाऊसकर, भाजप
२५.निगुडे : लक्ष्मण निगुडकर, गाव विकास
२६.निरवडे : सुहानी गावडे, गाव विकास
२७.ओटवणे : आत्माराम गांवकर, मविआ
२८.ओवळीये : तारामती नाईक, भाजप
२९.पाडलोस : सलोनी पेडणेकर, ठाकरे सेना
३०. पडवे माजगाव : नयना देसाई, भाजप
३१.पारपोली : कृष्णा नाईक गाव विकास
३२.रोणापाल : योगिता केणी, भाजप
३३.सांगेली : लवू भिंगारे, भाजप
३४.सरमळे : विजय गावडे, भाजप
३५.सातार्डा : संदीप प्रभू, ठाकरे सेना
३६.साटेलि तर्फ सातार्डा : श्रावणी नाईक, भाजप
३७.सातुळी बावळाट : सोनाली परब, शिंदे गट
३८.शेर्ले : प्रांजल जाधव, भाजप
३९.शिरशिंगे : दिपक राऊळ, भाजप
४०.सोनुर्ली : नारायण हिराप,शिंदे गट
४१.तळवणे : गोविंद केरकर, अपक्ष युवा पॅनल
४२.तिरोडा : प्रियांका सावंत, मविआ
४३.वेर्ले : रूचिता राऊळ, भाजप
४४.वेत्ये : गुणाजी गावडे, ठाकरे सेना
४५.विलवडे : प्रकाश दळवी, भाजप
ठाकरे सेनेला धोबीपछाड देत माजगांवात भाजपचे कमळ फुलले
सावंतवाडी तालुक्यात लक्षवेधी ठरलेल्या माजगांव ग्रामपंचायतीत अखेर ठाकरे सेनेला धोबीपछाड देत भाजपा व बाळासाहेबांची शिवसेना युतीने बाजी मारली. युतीच्या सरपंच पदाच्या उमेदवार डॉ. अर्चना अजय सावंत या ३६८ मताधिक्क्याने विजयी झाल्या. युतीचे एकूण ९ सदस्य तर ठाकरे सेनेचे ४ सदस्य विजयी झाले. या ठिकाणी सेना विजयी होईल असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला होता मात्र भाजपा युतीने त्यांचे मनसुबे उधळून लावत दिमाखदार विजय संपादीत केला.
