कुंभारमाठ येथील मृत इसमाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह
*💫मालवण दि.०८-:* मालवण ग्रामीण रुग्णालयात आज सकाळी कुंभारमाठ येथील ४५ वर्षीय इसमाला उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर त्या व्यक्तीचा काही वेळातच उपचारादरम्यान मृत्यू झाला. याच दरम्यान त्या रुग्णाची कोरोना रॅपिड टेस्ट करण्यात आली असता तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे मालवण तालुक्यात कोरोना बळींची संख्या २१ वर पोहचली आहे. कुंभारमाठ येथील ४५ वर्षीय व्यक्तीला दम्याचा त्रास जाणवल्याने आज सोमवारी सकाळी उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या रुग्णाला अन्य आजारही होता, त्यावरही उपचार सुरू होते. मालवण ग्रामीण रुग्णालयात सोमवारी अन्य ७ व्यक्तींची कोरोना रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली. या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. आतापर्यंत तालुक्यात एकूण ५७९ कोरोना रुग्ण सापडून आले. त्यापैकी ५३६ रुग्ण बरे झाले. २१ रुग्णांचा मृत्यू झाला. तर २२ रुग्णांवर सध्यस्थितीत उपचार सुरू आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
