मुद्रा एज्युकेशन ट्रस्ट मुंबईतर्फे कुडाळ व मालवण येथे निसर्ग चित्रण व रांगोळी स्पर्धा

⚡कणकवली ता.१५-: मुद्रा एज्युकेशन ट्रस्ट मुंबई, सिंधुदुर्ग कला महाविद्यालय कणकवली व महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ- सिंधुदुर्ग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने निसर्गरम्य पर्यटन विभागामध्ये कलेचा प्रसार होण्याच्या दृष्टीने स्थानिक तसेच महाराष्ट्रातील पर्यटक यांना सिंधुदुर्गातील निसर्ग सौंदर्याचा अविष्कार दाखविण्याकरिता आपल्या जिल्ह्यात कला महाविद्यालयीन विद्यार्थी व कला अध्यापक यांच्यावतीने एक कला मेळावा – २०२२ आयोजित करण्यात येत आहे.

कला क्षेत्रातील विद्यार्थी अध्यापक यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होऊन त्यांना संपन्न अनुभव या कला शिक्षणाद्वारे मिळेल व ते या स्पर्धेच्या जगात अधिक आत्मविश्वासाने वावरू शकतील म्हणूनच कला महाविद्यालयीन व शालेय शिक्षणाबरोबर मुलांची कला विषयाची रुची वाढविण्यासाठी कला शिक्षणावर भर देणे आवश्यक असल्यामुळे कलाशिक्षण लोकाभिमुख करण्याच्या कार्यात कला अध्ययनाचे महत्त्वपूर्ण स्थान ओळखून राज्यस्तरीय निसर्गचित्रण स्पर्धा २०२२ व रांगोळी स्पर्धेचे आयोजन विनामुल्य करण्यात आले आहे.

सदर कला मेळावा कोकण हेरिटेज(कुडाळकर फार्महाउस) मुळदे, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी २१ ते २४ डिसेंबर २०२२ या कालावधीत सकाळी १० ते ५ या वेळेत आयोजित करण्यात येत आहे. सदर कला मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील कलारसिकांना पाहण्यासाठी प्रत्यक्ष निसर्ग चित्रण विद्यार्थ्यांनी रेखाटलेली अशी विलोभनीय चित्रे पाहता येतील तसेच २१ डिसेंबर २२ रोजी दुपारी २ नंतर व्यक्तिचित्रण रांगोळी रेखाटन कलाकारांनी साकारलेल्या भव्य दिव्य रांगोळी पाहता येतील व त्याचा आनंद घेता येईल. त्याचबरोबर २१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता मुंबई शहरातील सुप्रसिद्ध रांगोळीकार महादेव गोपाळे यांच्या रांगोळीचे रेखाटनाचे प्रात्यक्षिक पाहता येईल या कला मेळाव्याच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलाध्यापकांकरीता स्वतंत्र प्रत्यक्ष निसर्ग चित्र स्पर्धा २३ डिसेंबर २०२२ रोजी मालवण तालुक्यात आयोजित करण्यात आलेली असून सदर स्पर्धा विनामूल्य असेल त्या स्पर्धेतील विजेत्या कलाकृतीस मुद्रा एज्युकेशन ट्रस्टतर्फे पारितोषिके देण्यात येतील.
अशा भव्य दिव्य कला मेळाव्यामध्ये कलाक्षेत्रातील मान्यवरांकडून सदर कालावधीमध्ये प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आलेले आहे. २३ डिसेंबर २०२२ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध चित्रकार दिगंबर मांडवकर यांच्याकडून प्रत्यक्ष निसर्ग चित्रणचे सादरीकरण करण्यात येईल. तसेच मान्यवर चित्रकाराची प्रात्याक्षिके आहेत त्या मध्ये नितीन निगडे यांचे कॅरीकेचर वर प्रात्याक्षिक व विरेंद्र मांजरेकर यांचे क्ले मध्ये व्यक्तीचित्रणाचे प्रात्याक्षिक आयोजित केलेले आहे.

सदर कला मेळाव्याचे आयोजन यशस्वीकरण्या करिता मुद्रा एज्युकेशन ट्रस्ट मुंबई)तसेच विशेष सहाय्य महाराष्ट्र राज्य कला अध्यापक संघ जिल्हा सिंधुदुर्ग अध्यक्ष रुपेश नेवगी, सचिव- समिर चांदरकर यांचे सहाय्य लाभले. फार्म हाऊसचे विश्वस्त गजानन कुडाळकर यांचे पाठबळ लाभले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलारसीक, कलाप्रेमी यांच्यासाठी हा कला मेळावा एक पर्वणी ठरू शकतो अशी माहिती मुद्रा एज्युकेशन ट्रस्टचे नितिन जाधव यांनी दिली.

You cannot copy content of this page