⚡मालवण ता.१४-: विद्यार्थ्यानी बचत करायला सुरुवात केली पाहिजे. आर्थिक नियोजनाकडे सजगतेने पाहिले पाहिजे, विविध प्रकारच्या बचत आणि विमा योजनांचा लाभ घ्यायला सुरुवात केली पाहिजे, असे प्रतिपादन सिद्धिश्री माणगांवकर यांनी येथे बोलताना केले.
मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण येथे कॉमर्स असोसिशन आणि क्रीसिल फाउंडेशन मनी वाइज सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने “आर्थिक साक्षरता प्रशिक्षण ” कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेच्या प्रथम सत्रात कॉमर्स असोसिएशनच्या प्रमुख डॉ. सुमेधा नाईक यांनी बचतीचे दैनंदिन जीवनातील महत्त्व तसेच अभ्यासक्रमाच्या दृष्टीने आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूक यांचे महत्व अधोरेखित केले. तर दुसऱ्या सत्रात मनी वाईज सेंटर च्या केंद्र व्यवस्थापक आणि प्रमुख वक्त्या सिद्धिश्री माणगावकर यांनी फ्लीप बुकच्या माध्यमांतून आणि उदाहरणे देऊन बचतीच्या विविध मार्गांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या शंकांचे देखील त्यांनी निरसन केले.
या कार्यशाळेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकुर यांनी विद्यार्थ्यांना आपण कोणकोणत्या माध्यमातून बचत करू शकतो, याबाबत मार्गदर्शन केले. द्वितीय वर्ष वाणिज्यचा विद्यार्थी दत्ता मालाडकर याने आभार प्रदर्शन केले. या कार्यशाळेत द्वितीय आणि तृतीय वर्ष वाणिज्य विभागाच्या ६२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. या कार्यशाळेसाठी प्रा. बी. एच. चौगुले, डॉ. एम. आर. खोत, डॉ. डी. व्ही. हारगीले, प्रा. प्रमोद खरात, नेहा चौकेकर इत्यादी उपस्थित होते. कार्यशाळेचे नियोजन आकाश तावडे, दत्ता मालाडकर, शुभम पवार आदी विद्यार्थ्यानी केले.
