सकारात्मक गोष्टीतूनच तरुणाईची प्रगती…

*रीगल कॉलेज वार्षिक इव्हेंट मॅनेजमेंट कार्यक्रमात कवयित्री सविता पवार यांचे प्रतिपादन

*💫कणकवली दि.०८-:* माणसाची लढाई आता माणसाशीच सुरू असून अशा काळात तरुण पिढीने आपल्यातील संवेदनशीलता हरवू नये. हॉटेल अँड टुरिझम मॅनेजमेंट हे शिक्षण माणसाला माणसाशी जोडण्यास कारणीभूत ठरत असते. त्यामुळे दररोजच्या जीवनातील सकारात्मक गोष्टी स्वीकारत पुढे जायला हवं असे प्रतिपादन कवयित्री सरिता पवार यांनी जानवली येथील रीगल कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या इव्हेंट मॅनेजमेंट समारंभात केले. रीगल कॉलेजचा इव्हेंट मॅनेजमेंट वार्षिक समारंभ कवयित्री सरिता पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना त्यांनी बाबा वाक्यम प्रमाणम या वृत्तीपलीकडे जाऊन आजच्या पिढीने स्वतःला डेव्हलप करणं महत्त्वाचं असल्याचे आग्रहाने सांगितले. यावेळी मंचावर रीगल कॉलेजचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश परुळेकर, कवयित्री प्रा.मनीषा पाटील, प्राचार्य तृप्ती मोंडकर , आरोलकर, स्वाती राणे, शिवानी काळसेकर, सौरभ बांदेकर, मधुरा सावंत आदी उपस्थित होते. पवार म्हणाल्या, व्यवसायातून स्वतःतील माणुसपणाला न्याय देण्याची संधी प्राप्त होत असते.त्यामुळे आजच्या पिढीतील पॉझिटिव्ह गोष्टीचा आपण सतत स्वीकार केला पाहिजे. त्यातूनच नाविन्याची ओढ आपल्याला लागते. प्रश्न विचारायची ताकद आपण आपल्यात निर्माण केली पाहिजे. प्रश्न इतरांना विचारल्याशिवाय आपल्याही जाणिवा प्रगल्भ होत नाहीत. ग्रेटा आणि मलाला या तरुणीने जागतिक इतिहास निर्माण केला. प्रश्न विचारणाऱ्या तरुणाई समोर या दोघांचा आदर्श असला पाहिजे. अनेक महनीय व्यक्तींनी तरुणाईवर दाखवलेला विश्वास महत्त्वाचा असून त्यामुळेच तरुणाईला प्रेरणा मिळत आहे. स्वातंत्र्य लढा ते आताची सामाजिक चळवळ आणि त्यातील तरुणाईचा सहभाग आजच्या पिढीने समजून घ्यायला हवा . विविध आपत्तीमध्ये संवेदनशीलपणे काम करणारी तरुण मुलं आजही कार्यरत असतात. हा आदर्श महत्त्वाचा आहे. चांगल्या चळवळींशी , आजूबाजूच्या चांगल्या माणसांशी जोडून घेणं महत्त्वाचं असून वाचनातून व्यक्तिमत्व विकास आकारास येतो. आजच्या कॉपी-पेस्ट-फॉरवर्ड या त्रिकोणातून बाहेर पडून स्वतःचा अभ्यास आणि स्वतःची ठाम मते , भूमिका तयार करणे महत्त्वाचे असते. स्त्री-पुरुष यांच्यातील दिवसागणिक प्रगल्भ होणारं नातं समजून घेतलं तर त्यातील अंतर विरोधही समजून येतात. मात्र याच बरोबर देशातील सद्य परिस्थिती समजून घेऊन अशाही परिस्थितीत आपल्यातील माणूसपणाची लढाई विसरू देता नये. यावेळी श्री परुळेकर, प्राचार्य आरोलकर यांनीही विचार मांडले. शिवानी काळसेकर सौरभ बांदेकर यांनी सूत्रसंचालन केले. आभार मधुरा सावंत यांनी मानले.

You cannot copy content of this page