व्यापारांना दिलासा मिळण्यासह पर्यटन विकासाला चालना:भाई चव्हाण
⚡कणकवली ता.०६-: गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहिला तर आंगणेवाडी आणि कुणकेश्वर या दोन महाजत्रांमध्ये साधारण आठवड्याभराचा कालावधी असायचा. पण यंदा तब्बल दोन आठवड्यांचा कालावधी आहे. त्यामुळे सर्वं प्रकारच्या व्यापार्यांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे राज्य शासनाने पुढाकार घेऊन मधल्या आठवड्यात श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे महाराष्ट्र राज्य पर्यटन-खाद्य महोत्सवाचे आयोजन करावे, अशी मागणी कोकण विकास आघाडीचे मुख्य संघटक, ज्येष्ठ पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण यांनी केली आहे.
यंदाची आंगणेवाडीतील भराडी देवीची महाजत्रा शनिवार ४ फेब्रुवारी २०२३ ला जाहीर झाली आहे. या जत्रेची तारीख भराडी देवीच्या कौलानुसार ठरली जाते. मात्र कुणकेश्वरची महाजत्रा तिथीनुसार १८ ते २० फेब्रुवारी अशी यंदा सलग तीन दिवस आहे. व्यापार्यांची आणि भाविकांची अपेक्षा असते की या दोन महाजत्रांमध्ये आठवडाभराचा फरक असावा. पण यंदा दोन आठवड्यांचा फरक आहे. त्यामुळे स्थानिक आणि परजिल्ह्यांतील हाॅटेल्स, मिठाई, पाळणा घरे, मौत का कुवा आदीं व्यापार्यांसह एसटी महामंडळाचेही धाबे दणालले आहेत, अशी माहिती देऊन चव्हाण म्हणतात, या दोन जत्रांमध्ये आठवडाभराचा कालावधी असला की स्थानिकासह मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, अलिबाग, पंढरपूर, सोलापूर, बेळगाव आदी विविध भागांतून येणारे हाॅटेल्स, मिठाई, अन्य खाद्यपदार्थ, पाळणी घरे, मौत का कुवा आदी व्यापारी आंगणेवाडीच्या दुसऱ्या दिवसाची मोड जत्रा संपताच ते आपला व्यवसाय कुणकेश्वरला हलवितात. पण यंदा या दोन जत्रांमध्ये दोन आठवड्यांचा कालावधी असल्याने कुणकेश्वर यात्रेचे नियोजन करण्यामध्ये मोठ्या अडचणींना सामना करावा लागणार आहे. एक तर त्यांना आपली दुकाने, करमणुकीची साधने मुळ शहारांत परत न्यावी लागतील. शिल्लक राहिलेल्या खाद्य पदार्थांची विल्हेवाट लावावी लागेल. करमणूक साधने असलेल्या व्यापार्यांना आठवडाभर व्यवसायांपासून नुकसान सहन करावे लागेल. त्यामुळे त्यांना हे व्यवसाय आटबट्याचे होतील.
या दोन्ही जत्रांसाठी रा. प. महामंडळाला भाविकांच्या सेवेसाठी परजिल्हांतून एसटी गाड्या मागवाव्या लागतात, अशी माहिती देऊन चव्हाण म्हणाले, दोन आठवड्यांचा कालावधी असल्याने या गाड्या परत माघारी पाठवून पुन्हा आठवड्याभरात मागवाव्या लागणार आहे. त्यामुळे एसटीचे नियोजनही त्रासदायक होणार आहे. प्रशासन आणि पोलीसावर ताण पडणार आहे.
व्यापाऱ्याचे, एसटी महामंडळाचे होणारे नुकसान पाहता आणि भाविकांना होणारा त्रास पाहता महाराष्ट्र राज्य शासनाला मधल्या काळात आठवडाभर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य पर्यटन-खाद्य महोत्सव आयोजित करण्याची एक सुवर्णसंधी चालून आली आहे, असे स्पष्ट करून ते म्हणाले, कुणकेश्वर हे यात्रा ठिकाण हे समुद्र किनारी आहे. त्यामुळे भाविकांसह पर्यटकांची वर्दळ इथे कायमच असते. राज्यातील विविध भागातील हाॅटेल्स व्यावसायिक त्या त्या भागातील खाद्य संस्कृतीचा मेळ या ठिकाणी घालतात. त्यामुळे कुणकेश्वर ग्रामपंचायत, देवस्थान समिती यांच्याशी प्रशासनाने चर्चा करून अशा प्रकारच्या महोत्सवाचे शासन स्तरावर आयोजन करावे. ग्रामपंचायतसह शासनाला मोठा महसूल कर रुपात मिळेल. या महोत्सवात विविध प्रकारचे करमणूकीचे कार्यक्रम ठेवावेत. तसेच कोकण पर्यटन वाढीसाठी सागरी क्रीडा प्रकार आदीचे आयोजन करावे. ऐतिहासिक वास्तू पहाण्यासाठी सहलीचे आयोजन करावे. त्यामुळे पर्यटकांसह व्यापारी वर्ग, भाविक वर्ग, एसटी महामंडळ यांना दिलासा मिळेल. पर्यटकांची पावले आपसूकच या महोत्सवाकडे वळतील.
