जात पमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त प्रमोद जाधव यांचे आवाहन
⚡मालवण ता.०१-: विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणी सहज आणि सुलभ व्हावी यासाठी शासनाने सोय केली असून जात पडताळणीची ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने असल्याने संकेत स्थळावर जात पडताळणी विषयीची आवश्यक ती कागदपत्रे स्कँन करुन जोडल्यानंतर ती पूर्णत्वास जाते त्यामुळे विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जात पमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त प्रमोद जाधव यांनी येथे बोलताना केले
सिंधुदुर्ग जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सिंधुदुर्ग यांच्यावतीने मालवण येथील भंडारी ए. सो. ज्युनियर कॉलेज येथे अकरावी व बारावीच्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी सहज सुलभ जात प्रमाणपत्र पडताळणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात जात पमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त प्रमोद जाधव यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्राबाबतच्या समस्या व शंका उपायुक्त प्रमोद जाधव यांच्यासमोर मांडल्या. विद्यार्थ्याच्या समस्यांचे प्रमोद जाधव यांनी निरसन केले. याप्रसंगी प्रशाळेचे मुख्याध्यापक वामन खोत, नारायण गंगावणे, प्रशांत देसाई, संग्राम कासले, प्रा स्नेहल पराडकर आदि उपस्थित होते.
यावेळी जात पडताळणी समितीचे उपायुक्त प्रमोद जाधव म्हणाले, सहज सुलभ जात पडताळणी करता यावी यासाठी शासनाने सोय केली आहे. विद्यार्थ्यांनी जात पडताळणीसाठी आवश्यक असणारे मूळ पुरावे स्कॅन करून घ्यावेत. त्यानंतर बार्टीच्या संकेतस्थळावर अकाऊंट सुरू करून मूळ पुरावे अपलोड करावेत. या प – वियेवेळी ऑनलाईन पद्धतीने १०० रूपयाचे शुल्क घेतले जाते. जात पडताळणीची ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने असल्याने विद्यार्थ्यांनी स्वत:चा ईमेल आयडी द्यावा. त्रयस्थ व्यक्तीचा ईमेल आयडी देवू नये. कारण विद्यार्थ्यांना त्याच ईमेल आयडीवर जात प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे. ज्या जिल्ह्यातून जात प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. त्याच जिल्ह्यातून जात पडताळणीसाठी अर्ज करावा. जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी मानवी दिनांकाचा पुरावा असणे म्हत्वाचा आहे. अनुसूचित जातीसाठी १० ऑगस्ट १९५०, विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी २१ नोव्हेंबर १९६१ इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास वर्गसाठी १३ ऑक्टोबर १९६७ पूर्वीचा पुरावा असणे आवश्यक आहे. मानवी दिनांकापूर्वीच्या जातनोंदणींना सर्वाधिक महत्त्व आहे. तसेच मानवी दिनांकापूर्वीचा कुटुंबाचा महाराष्ट्र राज्यातील कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी साध्या कागदावर प्रतिज्ञापत्र अनुज्ञेय आहे. बाँड पेपरची गरज नाही. हमीपत्र अर्ज विहित मुदतीनंतर उशीरा सादर केल्यास समितीतीला हमीपत्र द्यावे लागते ते साध्या कागदावर द्यावे असेही ते म्हणाले
