⚡मालवण ता.०१-: कोण आला रे कोण आला… महाराष्ट्राचा वाघ आला… राजसाहेब ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है… अशा घोषणा देत… ढोल ताशांच्या गजरात आणि मोठ्या उत्साहात आज सायंकाळी मालवण दौऱ्यावर आलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मालवण कुंभारमाठ येथील जानकी मंगल कार्यालय येथे जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी ठाकरे यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या या दौऱ्यामुळे मालवणातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
कोकण दौऱ्यावर असलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज सायंकाळी मालवणात दाखल झाले. तत्पूर्वी चौके येथे मनसे तालुकाध्यक्ष विनोद सांडव व कार्यकर्त्यांनी ठाकरे यांचे स्वागत केले. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता ठाकरे यांचा ताफा कुंभारमाठ येथील जानकी मंगल कार्यालय येथे दाखल झाल्यावर ढोल ताशांच्या गजरात ठाकरे यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी ठाकरे यांचे औक्षण करत स्वागत केले. यावेळी मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे, मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, राज्य सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर, धीरज परब यांच्यासह मनसे मालवण तालुकाध्यक्ष विनोद सांडव, मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर, मालवण शहर अध्यक्ष विशाल ओटवणेकर, महिला तालुकाध्यक्ष सौ. भारती वाघ, मनविसे तालुकाध्यक्ष संदिप लाड, शहराध्यक्ष वैभव माणगावकर, उदय गावडे, माजी तालुका अध्यक्ष भाई मालंडकर आदी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी जानकी मंगल कार्यालयाच्या सभागृहात मालवणसह मुंबई व इतर ठिकाणाहून आलेल्या कार्यकर्त्यांनी ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर राज ठाकरे यांनी बंद खोलीत मालवण तालुक्यातील मनसे व मनविसे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेऊन संवाद साधला.
मालवणात होणार भव्य क्रिकेट स्पर्धा
मालवणमधील कार्यकर्त्यांशी झालेल्या चर्चेत मालवण मधील टोपीवाला बोर्डिंग मैदान येथे डिसेंबर महिन्यात मनसेतर्फे क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले. ही स्पर्धा भव्य दिव्य पद्धतीने आयोजित करण्यासाठी ठाकरे यांनी मुंबईतील पदाधिकाऱ्यांनाही आदेश दिले असून या स्पर्धेला आपण स्वतः व अमित ठाकरे उपस्थित राहण्यासाठी पुन्हा मालवणात येणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितल्याची माहिती मनविसेचे अमित इब्रामपुरकर यांनी दिली.
व्यापारी संघाने घेतली ठाकरेंची भेट
यावेळी मालवण व्यापारी संघाने राज ठाकरे यांची भेट घेऊन विविध प्रश्न मांडले. यावेळी मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, नितीन तायशेटे, रवींद्र तळाशीलकर, उमेश शिरोडकर, नाना साईल, सरदार ताजर आदी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात टोल वसुली सुरू करण्यात येणार असल्याने यातून जिल्ह्यातील पासिंग असणाऱ्या एमएच ०७ क्रमांकाच्या गाड्यांना टोलमाफी मिळावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. यावर राज ठाकरे यांनी याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करू असे आश्वासन व्यापाऱ्यांना दिले. तसेच तौक्ते वादळात जेवढी नुकसानी वादळामुळे झाली नाही त्यापेक्षा जास्त नुकसानी झाडे कोसळून वीजवाहिन्या तुटून दहा दिवस वीज पुरवठा खंडित होऊन झाली. त्यामुळे मालवणात भूमिगत वीज वाहिन्या करण्यात याव्यात यासाठी आपल्यास्तरावर प्रयत्न व्हावेत अशी मागणीही यावेळी व्यापाऱ्यांनी ठाकरे यांच्याकडे केली. याबाबतही लक्ष घालण्याचे आश्वासन ठाकरे यांनी दिले.
कार्यकर्त्यांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांनी जानकी मंगल कार्यालयाच्या सॅफरॉन रेस्टॉरंट मध्ये चहापान केले. त्यानंतर त्यांनी मालवण बाजारपेठेत मनसेचे दिवंगत पदाधिकारी स्व. शैलेश अंधारी यांच्या निवासस्थानी भेट देऊन अंधारे कुटुंबियांचे सांत्वन केले. तर त्यानंतर जिल्हा व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष नितीन तायशेटे यांच्या मालवण मधील प्रसिद्ध अशा विजय बेकरीला ठाकरे यांनी भेट दिली.
देवबाग येथे मुक्काम
मालवण शहरातील भेटी गाठी घेतल्यानंतर रात्री राज ठाकरे देवबाग येथील हॉटेल विंडमिल कडे रवाना झाले. उद्या दि. २ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता राज ठाकरे आंगणेवाडी येथे श्री भराडी देवीचे दर्शन घेऊन कणकवलीकडे रवाना होणार आहेत.
