Headlines

अमित शहांच्या दौऱ्यामुळे महाराष्ट्रात सत्तांतर होईल

भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांचा विश्वास : कामाच्या श्रेयासाठी तिन्ही पक्षांमध्ये कुरघोडी सुरू

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ज्या प्रदेशात जातात तो प्रदेश शतप्रतिशत भाजपाचा होतो. गुजरात, उत्तरप्रदेश अमितभाई यांनी भाजपाच्या अमलाखाली आणले. पं बंगालमध्येही भाजपाचा मुख्यमंत्री होईल. सिंधुदुर्गातील शाह यांचे आगमन म्हणजे पालघर ते सिंधुदुर्ग भविष्यात शतप्रतिशत भाजपा असेल. अमित शाह यांच्या उद्याच्या दौऱ्यामुळे महाराष्ट्रातही सत्तांतर होईल असा विश्वास भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यानी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी भाजपा जिल्हा प्रसिद्धिप्रमुख बबलू सावंत, प्रसाद जाधव उपस्थित होते. महाराष्ट्रातील तिघाडी सरकारमुळे अधिकारी जेरीस आले आहेत. काम न करण्याकडे अधिकाऱ्यांचा कल आहे. कारण एकाच कामात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वेगवेगळे निर्देश देतात. कामाच्या श्रेयासाठी तिन्ही पक्षांमध्ये कुरघोडी सुरू आहे. आघाडी सरकारला जसे अधिकारी कंटाळलेत तशी जनताही कंटाळली आहे. उर्जामंत्र्यांनी निवडणुकीनंतर सांगितले होते की १०० युनिट पर्यंत विजमाफी देऊ, पण प्रत्यक्षात गरीब शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले जात आहे. काँग्रेसच्या मंत्र्यांना तिसऱ्या दर्जाची वागणूक दिली जात आहे. मुख्यमंत्री ठाकरेंना प्रशासनातील काही कळत नाही . त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस वाले त्याचा फायदा उचलत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्रीच शिवसेनेला अडचणीत आणणार अशी भीती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मनात असल्याचे मंत्रालयात फेरफटका मारल्यावर दिसून येते. आडाळी येथील आयुर्वेदिक संशोधन केंद्राबाबत काँग्रेसच्या वैद्यकीय मंत्र्यांचा अडथळा अजून दूर झालेला नाही. विकासकामांच्या श्रेयवादात जनतेचा विकास खुंटला आहे. नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्प काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला हवा आहे पण शिवसेना खोडा घालतेय. नाणार प्रकल्प शिवसेनेचे स्थानिक आमदार राजन साळवी, भास्कर जाधव यांना हवा आहे. खासदार विनायक राऊत का विरोध करतायत. एनरॉन प्रमाणे रिबेरा मार्क च्या भेटीची शिवसेनेचे नेते वाट पाहतायत काय ? असा खोचक सवाल जठार यांनी केला. राज्यात वीजबिल माफी विजमंत्री राऊत जाहीर करतात तर मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री पवार केवळ श्रेय मिळत नाही म्हणून विजबिलमाफी नाकारतात.यात जनता भरडली जातेय. आपला मुख्यमंत्री काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दबावामुळे काहीही करू शकत नाही हे समजल्यामुळे शिवसेनेचे आमदारही कंटाळले आहेत.पेट्रोलदरवाढ शिवसेनेला कमी हवीय तर राज्य सरकारचा सेझ कमी झाला तर बजेटवर ताण येईल म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार नकार देतायत. राज्य सरकारची एकंदरीत विदारक अवस्था झाली आहे अशी टीका भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी केली. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री शाह यांचा दौरा म्हणजे महाराष्ट्रातील सत्ताबदलाचे संकेत असल्याचे जठार म्हणाले.

You cannot copy content of this page