महाराष्ट्र एकीकरण समितीचे जिल्हाध्यक्ष अण्णा केसरकर यांचा आरोप;सावंतवाडीत सर्व पक्षीय बैठक संपन्न
सावंतवाडी : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न हा आजचा प्रश्न नाही. मराठी माणसाचे शेकडो हुतात्मे यात गेलेत. गेल्या अनेक वर्षांचा हा लढा असून या लढ्यात आमच्या सारख्यांनी तुरुंगवास भोगला आहे. वेळोवेळी कर्नाटक आपली दादागिरी करून मराठी माणसाची गळचेपी करण्याचा प्रयत्न करत आहे. कॉग्रेसच्या नेत्यांनी महाराष्ट्रात वीर सावरकर, तर भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांनी, राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल. यापासून मराठी माणसांचा लक्ष विचलित करण्यासाठी महाराष्ट्राच्या उप मुख्यमंत्र्यांनी केंद्रातील सत्तेच्या माध्यमातून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याना सीमावाद निर्माण करून सीमावादा बाबत अंतर्गत सुचना केल्याचा संशय आम्हाला येऊ लागला आहे. सोलापूर, पंढरपूर, अक्कलकोट यावर कर्नाटक आपला दावा सांगत असून यामागे राजकीय प्रेरणा आहे. मराठी माणसाची दिशाभूल करत लक्ष विचलित कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून प्रांतवाद करण्याच देवेंद्र फडणवीस यांच षडयंत्र असल्याचा संशय अण्णा केसरकर यांनी व्यक्त केला. तर अनेक मराठी माणसांसाठी लढणारे नेते भाजपात आहेत, युतीच्या माध्यमातून सत्तेत आहेत. त्यांनी आपला स्वाभिमान जागृत करत महाराष्ट्राच्या राष्ट्रपुरुषांवर अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांसह कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याना पक्षातून काढून टाकण्याची मागणी करावी असं मत श्री. केसरकर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष वसंत उर्फ अण्णा केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षियांची बैठक सावंतवाडीत पार पडली. या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या भाजप प्रवक्ते, राज्यपालांसह कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निषेधाचा ठराव घेण्यात आला. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या निषेधाचा ठराव माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी मांडला. तर राष्ट्रपुरुषांचा अवमान करणाऱ्या नेत्यांबाबत कोणतीही दखल न घेणाऱ्या महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांच्या निषेधाचा ठराव उमेश कोरगावकर यांनी मांडला. दरम्यान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत नेमण्यात आलेल्या राज्यस्तरीय कमिटीत ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर यांना सामावून घ्यावं असा एकमुखी ठराव घेण्यात आला.
स्वतःची सत्ता टिकवणे, संकुचित वृत्ती बाळगत विशाल दृष्टिकोन बाळगून वाटचाल करत आहोत अशा पद्धतीचे संस्कृत शब्द बाहेर काढत, मराठी माणसाच्या डोक्यावरून जाणारे शब्द वापरत सत्तेत बसलेली मंडळी आपल्या चातुर्यानं इतरांना खेळवत ठेवत आहे याची जाणीव जनतेला होत असून ते सावध झाले आहेत. आज महाराष्ट्रावर शाब्दिक हल्ले सूरू झाले असून महाराष्ट्राचे लचके तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. महागाई, बेकारी, राष्ट्रपुरुषांचे अवमान यावरून लक्ष विचलित करण्यासाठी हे षडयंत्र रचल जात असून मराठी तरुणांनी हे षडयंत्र रोखण्यासाठी एकत्र यावं, आता रडत बसू नका, लढायला मैदानात उतरा असं आवाहन अण्णा केसरकर यांनी केले.यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक उमा वारंग, विलास जाधव, सुरेश भोगटे, उमेश कोरगावकर आदी उपस्थित होते.
