सावंतवाडी कोर्टकडील वळणावर संरक्षण भिंत उभारा…

रवी जाधव: नगरपालिका प्रशासनाच वेधले लक्ष…

⚡सावंतवाडी, ता.१२-: सावंतवाडी शहरातील कोर्टाकडून बाजाराच्या दिशेने जाणाऱ्या वळणाजवळ दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने संरक्षण भिंत उभारावी, अशी मागणी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी केली आहे.

चार वर्षांपूर्वी मोती तलावाच्या काठी मंगळवारचा बाजार भरत असताना याच ठिकाणी दुर्दैवी घटना घडली होती. फूटपाथवर फळ विक्री करणाऱ्या एका विक्रेत्याचा तोल जाऊन तो नाल्यात पडला होता. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्या वेळी रवी जाधव यांनी नागरिकांच्या मदतीने नाल्यात उतरून संबंधितास बाहेर काढत तात्काळ रुग्णालयात दाखल केले होते. मात्र गंभीर दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जाधव यांनी त्या ठिकाणी संरक्षण भिंत उभारण्याची मागणी नगरपरिषदेकडे केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे त्यांनी सांगितले.

नुकत्याच नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी शहर स्वच्छतेवर भर देत संबंधित नाल्याची साफसफाई करून घेतली आहे. दरम्यान, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या संकल्पनेतून नाल्यात कृत्रिम वन्यप्राणी बसविण्यात आल्याने तो परिसर पर्यटनस्थळ म्हणून ओळखला जातो. बाहेरून येणारे पर्यटक तसेच सहलीसाठी येणारी मुले येथे मोठ्या संख्येने गर्दी करतात. त्यामुळे भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवकांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी विनंती जाधव यांनी केली आहे. सध्या त्या ठिकाणी फूटपाथचे काम सुरू असून त्यासोबत संरक्षण भिंतीचे काम केल्यास संभाव्य अपघात टळू शकतात, असेही त्यांनी नमूद केले.
याशिवाय पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होत असल्याने सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वखर्चाने खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले होते. मात्र वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे पुन्हा खड्डे पडले आहेत. गॅस पायपिंगसाठी सुरू असलेल्या खोदकामामुळेही अपघाताची शक्यता वाढली आहे. सावंतवाडी बाजारपेठेत वाढलेल्या धुळीमुळे व्यापारी त्रस्त असून मोती तलावाच्या पाण्याला दुर्गंधी येत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

You cannot copy content of this page