Headlines

मध्यरात्री निसर्गाचा कहर, चौकुळच्या महार्टवाडी-बेरडकीवर वादळाचा घाला…

क्षणात उद्ध्वस्त झाली गरीबांची घरे:चक्रीवादळासारख्या वाऱ्याने उडाली घरांची छपरे, वृद्धाचे घर कोसळले; २४ हून अधिक कुटुंबांचे मोठे नुकसान…

⚡आंबोली,ता.०४-:
चौकुळ गावातील महार्टवाडी-बेरडकी येथे शनिवारी मध्यरात्री सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास निसर्गाने अक्षरशः थैमान घातले. प्रचंड वेगाने सुटलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झाली. काही क्षणांतच घरांवरील सिमेंटची पत्रे हवेत उडाली, कौलारू घरे उद्ध्वस्त झाली, तर एका वृद्धाचे घर पूर्णपणे कोसळले. झोपेत असलेली लहान मुले, महिला आणि वृद्ध जीव मुठीत धरून घराबाहेर धावत सुटले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र अनेक कुटुंबांचे आयुष्यभराचे कष्ट काही मिनिटांत उद्ध्वस्त झाले.
या भीषण आपत्तीत सप्तवती पांडुरंग नाईक, ज्ञानेश्वर वसंत नाईक, एकनाथ वसंत नाईक, कृष्णा पुंडलीक नाईक, संदीप नामदेव नाईक, आनंद नामदेव नाईक, उत्तम लक्ष्मण नाईक, रमेश लक्ष्मण नाईक, परशुराम मारुती नाईक, चंद्रकांत दत्ताराम नाईक, संजय तुकाराम नाईक, मधू मश्नु नाईक, सकराम मश्नु नाईक, कृष्णा दत्ताराम नाईक, संतोष दत्ताराम नाईक, पांडुरंग दत्ताराम नाईक, बाबू नाईक, सुरेश नाईक, सोम बुधाजी नाईक, यशवंत बुधाजी नाईक, संजय प्रभाकर नाईक, भिरू सखाराम नाईक, पांडुरंग नाईक आणि तानाजी नाईक यांच्या घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
महार्टवाडी-बेरडकीतील बहुतांश घरे ७० ते ८० वर्षे जुनी, मातीची व कौलारू असल्याने वादळाचा सर्वाधिक फटका या कुटुंबांना बसला. आधीच जीर्ण अवस्थेतील घरांचे छप्पर उडून गेल्याने अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत. आंबोली परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या नागरिकांसमोर राहण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या वाडीतील बहुतांश नागरिक मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. दिवसाची मजुरी मिळाली तरच चूल पेटते. अशा परिस्थितीत घरांची दुरुस्ती करणे त्यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे शासनाने तातडीने आर्थिक मदत, ताडपत्री, बांधकाम साहित्य आणि जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
विशेष म्हणजे, घटना घडून अनेक तास उलटूनही अद्याप कोणताही शासकीय अधिकारी पंचनामा किंवा पाहणीसाठी पोहोचला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे संताप व्यक्त करत “संकट आमच्यावर कोसळले, पण मदतीला प्रशासन कधी धावणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

You cannot copy content of this page