Headlines

आंबोली सनसेट पॉइंटवर तीन दिवसांपासून भलामोठा दगड रस्त्यावरच…

अपघाताचा धोका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षाचा आरोप..

⚡आंबोली,ता.०४-: आंबोली घाटातील प्रसिद्ध सनसेट पॉइंट परिसरात तीन दिवसांपूर्वी डोंगरकड्यावरून एक भलामोठा दगड तसेच अनेक छोटे-मोठे दगड आणि माती रस्त्यावर कोसळली. सुदैवाने हा मोठा दगड शेजारील चहाच्या टपरीवर कोसळला नाही. अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता

घटना घडून तीन दिवस उलटले तरी रस्त्यावर पडलेला भलामोठा दगड, दगडांचा ढिगारा आणि माती अद्यापही हटविण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत पोलिस प्रशासनासह संबंधित विभागांना माहिती देण्यात आली असूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

सध्या हा मोठा दगड रस्त्याच्या कडेला असल्यामुळे वाहनधारकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा मुसळधार पावसात या दगडाला वाहन धडकून गंभीर अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर दुर्लक्षाचा आरोप करत सांगितले की, आंबोली घाट परिसरात दरवर्षी पावसाळ्यात लहान-मोठे दरडी कोसळणे, झाडे पडणे आणि दगड रस्त्यावर येण्याच्या घटना घडतात. मात्र अशा धोकादायक ठिकाणांकडे वेळेत लक्ष दिले जात नसल्याने वाहनचालक आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

महाराष्ट्रातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ असलेल्या आंबोलीत पावसाळी पर्यटन हंगाम सुरू झाला असून दररोज मोठ्या संख्येने पर्यटक येथे भेट देत आहेत. अशा वेळी रस्त्यावर पडलेले दगड आणि माती तातडीने हटविण्यात आली नाही, तर गंभीर अपघात घडण्याबरोबरच आंबोलीच्या पर्यटनावरही विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

त्यामुळे रस्त्यावर पडलेला भलामोठा दगड, माती आणि इतर दगड तातडीने हटवून रस्ता सुरक्षित करावा, तसेच घाट परिसरातील धोकादायक ठिकाणांची पाहणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी संबंधित प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे केली आहे.

You cannot copy content of this page